वांद्रे वसाहतीची दुरुस्ती पूर्ण करणार - पाटील
By Admin | Published: April 1, 2017 03:11 AM2017-04-01T03:11:27+5:302017-04-01T03:11:27+5:30
वांद्रे येथील सरकारी वसाहतीतील ३६ इमारतींच्या डागडुजीचे काम येत्या दोन वर्षांत पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती
मुंबई : वांद्रे येथील सरकारी वसाहतीतील ३६ इमारतींच्या डागडुजीचे काम येत्या दोन वर्षांत पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. तसेच कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी घरे देण्यासाठी सरकार सकारात्मक असल्याचे सांगितले.
वांद्रे येथील सरकारी वसाहतीत इमारतींच्या दुरुस्तीचे काम अत्यंत धीम्यागतीने होत आहे, तर काही कामे अर्धवट अवस्थेत आहेत. याबद्दल शिवसेना सदस्य अनिल परब यांनी लक्षवेधी सूचना मांडली. यावरील चर्चेला उत्तर देताना पाटील म्हणाले की, या वसाहतीत ३७० इमारतींत ४,४०० फ्लॅट्स आहेत. त्यातील ३६ इमारतींची तातडीची डागडुजी हाती घेण्यात आली आहे. त्यासाठी १०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. मात्र पूर्ण सरकारी वसाहतीचा पुनर्विकास करण्यात येणार असल्याने सध्या दुरुस्तीचे काम थांबवण्यात आले आहे.
या वसाहतीचा पुनर्विकास होणार असून तिथे सहा हजार घरे बांधली जाणार आहेत. ही घरे कर्मचाऱ्यांना भाड्याने द्यावीत, अशी मागणी अनिल परब यांनी केली. त्याबाबत सरकार सरकारात्मक असून राज्यभरातील सर्व वसाहतींसाठी धोरण करावे लागेल, असे पाटील म्हणाले. (प्रतिनिधी)