Join us

बंदचा मुंबईतील वाहतुकीवर फारसा परिणाम नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 09, 2020 4:04 AM

दादर, परळ, लालबाग वगळता इतर ठिकाणची दुकाने सुरूलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : केंद्र सरकारने नुकत्याच मंजूर केलेल्या शेतकरी ...

दादर, परळ, लालबाग वगळता इतर ठिकाणची दुकाने सुरू

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : केंद्र सरकारने नुकत्याच मंजूर केलेल्या शेतकरी कायद्यांविरोधात शेतकरी संघटनांनी दिलेल्या भारत बंदचा मुंबईतील वाहतुकीवर फारसा परिणाम झाला नाही. रेल्वे, रिक्षा, टॅक्सी वाहतूक नेहमीप्रमाणे सुरू हाेती. बेस्टच्या काही गाड्या मात्र रद्द करण्यात आल्या होत्या. तर दादर, परळ आणि लालबाग वगळता इतर ठिकाणी दुकाने सुरू होती.

काेराेना काळात रिक्षाचालकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे संघटनेकडून बंदचे कोणते आवाहन करण्यात आले नव्हते. रिक्षा, टॅक्सी वाहतूक नेहमीप्रमाणे सुरू होती, असे मुंबई मेन्स टॅक्सी युनियनचे नेते ए. एल. क्वाड्रोक्स यांनी सांगितले.

तर, फेडरेशन ऑफ रिटेल ट्रेडर्स वेल्फेअर असोसिएशनकडून बंदचे आवाहन करण्यात आलेले नव्हते. परंतु दादर, परळ, लालबाग भागातील दुकानदारांनी स्वखुशीने बंदमध्ये सहभाग घेतला. कुठेही जबरस्तीने दुकाने बंद करण्यात आली नाहीत किंवा वाद झाला नाही. मुंबईतील ९० टक्के दुकाने सुरू होती. बंदमुळे ४० टक्के ग्राहक कमी होते, असे फेडरेशन ऑफ रिटेल ट्रेडर्स वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष विरेन शाह यांनी सांगितले.

* बँक कर्मचाऱ्यांनी ‘बँकर्स फॉर फार्मर्स’चे बिल्ले लावून केले काम

राज्यातील दहा हजारांहून अधिक शाखेत काम करणाऱ्या तीस हजारांहून अधिक बँक कर्मचाऱ्यांनी ‘बँकर्स फॉर फार्मर्स’ असे बिल्ले परिधान करून काम केले. यात सार्वजनिक क्षेत्रातील बँका, जुन्या खासगी बँका, ग्रामीण बँकांतील कर्मचारी तसेच कोल्हापूर जिल्हा सहकारी बँकेतील कर्मचारीही सहभागी झाले हाेते. बँक कर्मचाऱ्यांनी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी विविध शहरात आयोजित निदर्शनातही सहभाग नोंदवल्याचे महाराष्ट्र स्टेट बँक एम्प्लॉइज फेडरेशनचे सरचिटणीस देवीदास तुळजापूरकर यांनी सांगितले.

* एसटीच्या ७४७० गाड्या रद्द

राज्यात शेतकरी कायद्याविरोधातील बंदचा एसटीला फटका बसला. मंगळवारी एसटीच्या १८८८२ गाड्या सुटणार होत्या, मात्र १०८६८ सुटल्या. बंदमुळे ७४७० गाड्या, तर इतर कारणांमुळे ५४४ गाड्या रद्द करण्यात आल्या.

...........................