वांद्रेत बेस्ट बसने श्वानाला चिरडले ! चालकावर खेरवाडीत गुन्हा दाखल
By गौरी टेंबकर | Published: June 22, 2024 12:18 PM2024-06-22T12:18:29+5:302024-06-22T12:22:43+5:30
वांद्रे पूर्व परिसरात एका श्वानाला धडक देत तिच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी बेस्ट बस चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी एका प्राणीमित्र महिलेने खेरवाडी पोलिसात तक्रार दिली होती.
मुंबई: वांद्रे पूर्व परिसरात एका श्वानाला धडक देत तिच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी बेस्ट बस चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी एका प्राणीमित्र महिलेने खेरवाडी पोलिसात तक्रार दिली होती.
तक्रारदार ऋतुजा दळवी (२७) या खाजगी कंपनीत काम करत असून त्या २० जून रोजी रात्री दहा वाजता घरी होत्या. त्यावेळी त्यांना किरण मोरे या परिचयाच्या व्यक्तीने फोन करत गकवारे हॉलच्या समोर एका श्वानाला बेस्ट चालकाने धडक देत अपघात केल्याचे कळवले. ते एकूण दळवी यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि जखमी अवस्थेत एक श्वान सदर ठिकाणी नीचपित पडलेले त्यांना दिसले. ते हालचाल करत नसल्याने त्याचा मृत्यू झाल्याची त्यांची खात्री झाली. सदर बस चालकाला स्थानिकानी थांबवण्याचा प्रयत्न केला मात्र तो तिथून पळून गेला असे दळवींना समजले.
दळवी यांच्या दोन मित्रांनी मोटरसायकलवरून त्या बसचा पाठलाग केला. तेव्हा तिथून रूट क्रमांक ८७ ही बस गेल्याचे त्यांना समजले. त्यांनी बेस्ट कर्मचाऱ्यांकडे चालकाची विचारणा केली असता त्याचा बॅच क्रमांक त्यांनी पुरवला. त्यानुसार सदर बॅच धारकाच्या विरोधात दळवीकडून मिळालेल्या तक्रारीनंतर खेरवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.