मुंबई: वांद्रे रेल्वे स्थानक परिसरात काल संध्याकाळी उसळलेल्या गर्दी प्रकरणी पोलिसांनी पत्रकार राहुल कुलकर्णी यांना ताब्यात घेतलं आहे. अडकलेल्या मजुरांना गावी नेण्यासाठी ट्रेन सुरू केल्या जाणार असल्याचं वृत्त दिल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली. वांद्रे पोलिसांनी कुलकर्णी यांच्याविरोधात एफआयआर दाखल केला. उस्मानाबाद पोलिसांनी पहाटेच त्यांना ताब्यात घेऊन मुंबईला पाठवलं.लॉकडाऊनमुळे अडकलेल्या मजुरांना त्यांच्या गावी नेण्यासाठी जनसाधारण स्पेशल ट्रेन्स सोडण्यात येणार असल्याचं वृत्त एबीपी माझानं काल सकाळी दाखवलं होतं. दक्षिण मध्य रेल्वेनं काढलेल्या पत्राच्या आधारे वृत्त दिल्याचं राहुल कुलकर्णींनी वार्तांकन करताना म्हटलं होतं. याच वृत्तामुळे काल दुपारच्या सुमारास वांद्र्यात गर्दी झाल्याचा दावा सोशल मीडियावर अनेकांनी केला. चुकीचं वृत्त दाखवण्यात आल्यानं मजुरांनी गर्दी केली, असा दावादेखील करण्यात आला.
वांद्र्यात नेमकं काय घडलं?कोरोनाचा वाढता धोका, लॉकडाउनमुळे उपासमारीची वेळ ओढावलेले हजारो मजूर विविध अफवांमुळे मंगळवारी दुपारी वांद्रे स्थानक परिसरात जमल्यानं तणाव निर्माण झाला. अखेर पोलिसांना तेथे अतिरिक्त कुमक मागवावी लागली. काही मजुरांनी आक्रमक पवित्रा घेतल्यानं पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. दोन तासांनी ही गर्दी नियंत्रणात आली. या प्रकरणी सुमारे ८०० जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मजुरांना सोडण्यासाठी ट्रेन चालवण्याचा विचार नाही- रेल्वे मंत्रालयकोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात ३ मे पर्यंत लॉकडाऊन वाढवण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली आहे. यानंतर रेल्वेनेही ३ मेपर्यंत प्रवासी वाहतूक बंद करण्याचं जाहीर केले. त्यामुळे १५ एप्रिल ते ३ मे दरम्यान देशभरात ज्या लोकांनी रेल्वेचे तिकिट बुक केले आहेत, त्यांचे बुकिंग आता रद्द केले जाणार आहे. विशेष म्हणजे रेल्वेने परिपत्रक काढून आणि ट्विट करुन कुठलिही विशेष रेल्वे चालविण्यात येणार नसल्याचेही स्पष्ट केले आहे. त्यामुळे, रेल्वेकडून अडकलेल्या मजूरांसाठी विशेष ट्रेन चालविण्यात येणार हे वृत्त निव्वळ अफवा असल्याचे स्पष्ट झाले आहे.