मुंबई : वांद्रे रेल्वेस्थानक परिसरात गर्दी जमण्यास झालेली सुरुवात आणि विनय दुबे याने पोस्ट केलेल्या व्हिडीओच्या वेळेत तफावत असल्याचे पोलिसाच्या एफआयआरमध्ये स्पष्ट होत आहे. त्यामुळे गर्दी जमविण्यात त्याचा संबंध नसून त्याला विनाकारण गोवण्यात आल्याचे वकिलांचे म्हणणे आहे. तर या प्रकरणात दुबे आणि अन्य संशयितांसह ११ जणांच्या पोलीस कोठडीत २३ एप्रिलपर्यंत वाढ मिळाल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयालक्ष्मी हिरेमठ यांनी सांगितले.दुबे याच्यावर व्हिडीओ पोस्ट करून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जमाव गोळा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. या अदखलपात्र गुन्ह्यात चंद्रशेखर हाडके या पोलीस निरीक्षकाला तक्रारदार करण्यात आले आहे. त्यानुसार हाडके यांच्या जबाबात १४ एप्रिल रोजी ५ वाजून ४० मिनिटांनी दुबेने फेसबुकवर पोस्ट टाकत लोकांना १८ एप्रिल, २०२० रोजी कुर्ला टर्मिनल्सला उशिरा रात्री जमण्यासाठी चिथावले असे म्हणण्यात आले आहे. तसेच त्याच्या एक दिवस आधी म्हणजे १३ एप्रिलला टिष्ट्वटरवर टाकलेल्या पोस्टमध्ये ‘अगर १८ एप्रिल को ट्रेने शुरू नहीं हुई, तो देशव्यापी मजदूर आंदोलन होगा. सरकार ध्यान दे, दुसरे राज्यो में अटके हुए लोगों को घर पहुचाय, तसेच महाराष्ट्र में फसे उत्तर भारत के मजदुरों को उनके घर पहुचाऊंगा, भले सरकार मुझे जेल में डाल दे’ असे वक्तव्य दुबेने केल्याचे नमूद केले आहे.तर दुबेचे वकील तन्वीर फारुखी यांनी दिलेल्या माहितीनुसार, वांद्रे पूर्वच्या शास्त्रीनगर, कुरेशीनगर, महाराष्ट्र, नर्गिसदत्तनगर या झोपडपट्टी परिसरामधील मजूर १४ एप्रिल रोजी ३ वाजून ४५ मिनिटांपासून ५ वाजून १५ मिनिटांपर्यंत वांद्रे रेल्वे स्थानकावर जमा झाल्याचे नमूद केले आहे. मात्र दुबेने ५ वाजून ४० मिनिटांनी व्हिडीओ पोस्ट केला आहे. तर १३ एप्रिलच्या व्हिडीओमध्ये त्याने १९ एप्रिलच्या रात्री मजुरांना कुर्ला टर्मिनल्सला जमण्यास सांगितले असून, त्यात १४ एप्रिलबाबत काहीच वक्तव्य केले नाही, असे फारुखी यांचे म्हणणे आहे.
'गर्दी जमण्याच्या वेळेत, तसेच व्हिडीओ पोस्टमध्ये तफावत!'
By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2020 5:48 AM