पालिका प्रशासनाचा निर्णय
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : वांद्रे-कुर्ला संकुल जम्बो कोविड केंद्र लवकरच संपूर्णतः वातानुकूलित करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. उन्हाळ्यात तापमान व आर्द्रतेमुळे रुग्णांना त्रास होण्याच्या समस्या उद्भवत होत्या, या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. येत्या आठवड्यात केंद्र वातानुकूलित करण्यात येईल.
वांद्रे-कुर्ला संकुल जम्बो कोविड केंद्र हे मुंबईतील एकमेव मोठे केंद्र असून, या केंद्रात एकूण २ हजार ३०० खाटा आहेत. त्यात ८०० हून अधिक ऑक्सिजन आणि १२० हून अधिक अतिदक्षता खाटा उपलब्ध आहेत. सद्य:स्थितीत या केंद्रात केवळ सामान्य कक्षातील खाटा उपलब्ध आहेत. अतिदक्षता आणि व्हेंटिलेटर खाटांची मागणी अधिक असून, या ठिकाणी जास्तीतजास्त रुग्ण दाखल आहेत. त्यामुळे स्थानिक लोकप्रतिनिधी आणि पालिका प्रशासनाला याची कल्पना दिली असून, लवकरच केंद्रातील खाटांच्या क्षमतेत वाढ करण्यात येणार असल्याची माहिती केंद्राचे अधिष्ठाता डॉ. राजेश डेरे यांनी दिली.
पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले की, केंद्रातील उपलब्ध वीजपुरवठ्यावर मोठ्या प्रमाणात वातानुकूलित सेवा देणे शक्य नाही. त्यामुळे पालिकेने या केंद्रातील वीजपुरवठ्यात वाढ करण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. लवकरच वीजपुरवठ्यात वाढ करून या केंद्रात कूलर आणि वातानुकूलित सेवा उपलब्ध करून देण्यात येईल. केंद्रातील हवा खेळती राहील याचीही काळजी घेण्यात येईल.
...............................