मुंबई : लसीकरणात बीकेसी कोविड केंद्राने बाजी मारली असून सहा महिन्यांत दोन लाखांहून अधिक नागरिकांचे लसीकरण करण्यात यश आले आहे, तर त्यापाठोपाठ गोरेगाव नेस्को लसीकरण केंद्र आहे. दरम्यान, सध्या लसीचे डोसच कमी प्रमाणात उपलब्ध होत असल्याने दिवसाला फक्त २०० हून अधिक नागरिकांचे लसीकरण केले जात असल्याचे कोविड केंद्रांकडून सांगण्यात आले आहे.
आतापर्यंत या लसीकरण केंद्रांत २ लाख ६४ हजार ८९२ नागरिकांचे लसीकरण झाले आहे. यात २ लाख ४८ हजार १०१ नागरिकांना कोविशिल्ड लसीचा डोस देण्यात आला आहे. तर, कोव्हॅक्सिन लसीचे डोस १६ हजार ७९१ जणांना देण्यात आले आहेत. नेस्को गोरेगाव कोविड लसीकरण केंद्रात आतापर्यंत २ लाख १९ हजार नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. यात २ लाख कोविशिल्ड आणि १९ हजार कोव्हॅक्सिनचे डोस देण्यात आले आहेत.
सामान्य नागरिकांसह बीकेसी लसीकरण केंद्रांवर सेलिब्रिटीही मोठी गर्दी करतात. आजपर्यंत बऱ्याच सेलिब्रिटींनी बीकेसी लसीकरण केंद्रांवर जाऊन लस घेतली आहे. रुग्णांना चांगल्या उपचारांनंतर लसीकरणा संबंधितही चांगली सोय या ठिकाणी करण्यात आली आहे, असे या कोविड केंद्राचे प्रभारी डाॅ. राजेश ढेरे यांनी सांगितले.
रुग्णांना उपचार देऊन बरे करण्यात ही बीकेसी कोविड केंद्र आघाडीवर होते आणि आता लसीकरणात ही पहिल्या स्थानावर असल्याचा आनंद आहे, अशी प्रतिक्रिया डॉ. ढेरे यांनी दिली आहे. मुंबईत जानेवारीपासून हेल्थ केअर आणि फ्रंटलाइन वर्कर्ससाठी लसीकरण सुरू केले गेले. त्यानंतर, १ मार्चपासून सामान्य नागरिकांसाठी लसीकरण सुरू झाले. तेव्हापासून आतापर्यंत २ लाखांहून अधिक नागरिकांना लसीकरण करण्यात यश आले आहे, असे नेस्को लसीकरण केंद्रांच्या प्रभारी डॉ. नीलम अंद्राडे यांनी सांगितले.
दरम्यान, दहिसर कोविड केंद्रात आतापर्यंत १ लाख ५७ हजार ४९४ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. यात १२,१३३ नागरिकांना कोव्हॅक्सिन आणि दीड लाखाहून अधिक नागरिकांना कोविशिल्ड देण्यात आले आहे. लस उपलब्ध झाली तर लसीकरणाचा आकडा आणखी वाढवता येईल. तरीही एक लाखाचा टप्पा पार केला आहे, असे दहिसर लसीकरण केंद्रांच्या प्रभारी डॉ. दीपा श्रीयन यांनी सांगितले.