लसींचा तुटवडा कायम
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबईतील सर्वांत मोठे लसीकरण केंद्र असलेल्या वांद्रे-कुर्ला जम्बो कोविड केंद्राच्या (बीकेसी) लसीकरण केंद्रामध्ये लसीचा साठा संपल्याने केंद्र बंद करण्यात आले आहे. मुंबई महापालिकेकडून तसे सांगण्यात आले आहे. लसीचा साठा उपलब्ध झाल्यानंतर बीकेसी लसीकरण केंद्र लसीकरणासाठी पुन्हा एकदा सुरू करण्यात येईल, असेही सांगण्यात आले. बीकेसी केंद्रावरील लससाठा संपल्याने नागरिकांना बुधवारीही लस न घेताच घरी परतावे लागले.
गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईतील लसीचा साठा कमी झाल्याने अनेक खासगी लसीकरण केंद्रे बंद करावी लागली आहेत. दरम्यान, नागरिकांनी लस घ्यायला जाण्याआधी लसीकरण केंद्रावर लस आहे का, हे तपासून पाहावे व त्यानंतरच लस घेण्यासाठी घराबाहेर पडावे, असे आवाहन महापौरांनी केले आहे. मात्र दुसरीकडे दहिसर, वांद्रे-कुर्ला संकुल आणि अन्य लसीकरण केंद्रांवर लस घेण्यासाठी येणाऱ्या नागरिकांची संख्या अधिक दिसून आली. जम्बो कोविड केंद्राबाहेर दीड ते दोन किलोमीटरपर्यंत लाभार्थ्यांना भर उन्हात ताटकळत राहावे लागले. शिवाय, तीन ते चार तास प्रतीक्षेत राहूनही लाभार्थ्यांना लस न घेता माघारी जावे लागले.
....................