वांद्र्याच्या स्कायवॉक नव्या स्वरूपात , पण खर्च १६ कोटीवरून ८० कोटींवर

By जयंत होवाळ | Published: February 7, 2024 08:50 PM2024-02-07T20:50:50+5:302024-02-07T20:51:02+5:30

महापालिकेने नव्या स्कायवॉकचे काम हाती घेतले असून सरकत्या जिन्यासह थेट म्हाडा कार्यालयापर्यंत स्कायवॉक जोडण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे.

Bandra skywalk in a new form but the cost from 16 crores to 80 crores | वांद्र्याच्या स्कायवॉक नव्या स्वरूपात , पण खर्च १६ कोटीवरून ८० कोटींवर

वांद्र्याच्या स्कायवॉक नव्या स्वरूपात , पण खर्च १६ कोटीवरून ८० कोटींवर

मुंबई : आधी एमएमआरडीएच्या अखत्यारीत असणारा, कालांतराने  मुंबई महापालिकेकडे सुपूर्द करण्यात आलेला  वांद्रे स्कायवॉक आता नव्या स्वरूपात आकारास येत आहे. नवा स्कायवॉक  थेट म्हाडा कार्यालयापर्यंत जोडला जाणार असला  तरी  सुधारित आराखड्यामुळे या स्कायवॉकचा खर्च १६ कोटी रुपयांवरून ८० कोटी रुपयांवर गेला आहे.


२००६ साली एमएमआरडीएने  वांद्रे पूर्व ते न्यायालय आणि कला नगर जंक्शनला जोडणाऱ्या मुंबईतील पहिल्या स्काय वॉकचे बांधकाम हाती घेतले आणि २००७ साली पूर्ण केले.   २०१५ मध्ये स्कायवॉक पालिकेकडे हस्तांतरीत करण्यात आला.दरम्यानच्या काळात व्ही. जे. टी. आय. या संस्थेमार्फत स्कायवॉकचे   सर्वेक्षण करण्यात आले.  सर्वेक्षणाअंती  स्कायवॉकचे बांधकाम धोकादायक झाल्याचे  आढळून आले.  त्यामुळे २०१९ पासून स्कायवॉक  पादचाऱ्यांसाठी बंद करण्यात आला. त्यानंतर तो  पडण्याचा निर्णय घेण्यात आला. महापालिकेने नव्या स्कायवॉकचे काम हाती घेतले असून सरकत्या  जिन्यासह थेट म्हाडा कार्यालयापर्यंत स्कायवॉक  जोडण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे १६ कोटींचा खर्च ८० कोटींवर गेला आहे.

जुना स्कायवॉक पाडून नवा बांधण्यासाठी निविदा प्रक्रिया राबवून जानेवारी २०२२ रोजी कंत्राटदाराची नेमणूक करण्यात आली. तसेच बांधकामासाठी कार्यादेश देण्यात आला होता. आधीच्या आराखड्यानुसार  स्कायवॉक ४८३ मीटर व ४.२ मीटर लांबीचा  बांधण्यात येणार होते. यासाठी १६.२० कोटी रुपये एवढा खर्च अंदाजित होता. परंतु त्याबाबत उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल झाली. स्कायवॉक पश्चिम द्रुतगती मार्ग ओलांडून म्हाडा कार्यालयापर्यंत करण्यासाठी पाऊले उचलून कार्यवाही करा. नव्या स्कायवॉकमध्ये सरकते जिने, विद्युत व्यवस्था तसेच उच्च बांधकाम उच्च प्रतीचे व दिर्घकाळ टिकणारे बनवा , असा आदेश न्यायालयाने दिला. त्यामुळे पहिले कंत्राट रद्द करून नव्याने कंत्राट देण्यासाठी निविदा मागवण्यात आली आहे. नवीन निविदेमध्ये पूर्वीच्या ४८३ मीटरच्या तुलनेत नवीन स्काय वॉकचे बांधकाम ७२० मीटर केले जाणार आहे.

असा असेल नवा स्कायवॉक
पुलाची लांबी -७४० मीटर
पुलाची रुंदी - ५१५ मीटर पर्यंत ६.५ मीटर , २२५ मीटर पर्यंत ४.३ मीटर
वैशिष्ट्ये - तीन सरकते जिने.
 

Web Title: Bandra skywalk in a new form but the cost from 16 crores to 80 crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई