वांद्रे टर्मिनससह स्थानकास आता मिळणार नवे रूप
By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2019 05:05 AM2019-02-05T05:05:18+5:302019-02-05T05:05:51+5:30
पश्चिम वांद्रे स्थानकाला आणि वांद्रे टर्मिनसला नवीन झळाळी देण्यात येणार असून या दोन्ही रेल्वे स्थानकांचे रूप पालटणार आहे. वांद्रे स्थानकाला हेरिटेजचा दर्जा आहे.
मुंबई - पश्चिम वांद्रे स्थानकाला आणि वांद्रे टर्मिनसला नवीन झळाळी देण्यात येणार असून या दोन्ही रेल्वे स्थानकांचे रूप पालटणार आहे. वांद्रे स्थानकाला हेरिटेजचा दर्जा आहे. त्यानुसार या स्थानकाच्या बांधकामात कोणत्याही प्रकारचा बदल किंवा धोका न पोहोचविता काम करण्यात येणार आहे.
अंतरिम रेल्वे अर्थसंकल्पात या कामासाठी ६६.६२ कोटींचा राखीव निधी मंजूर करण्यात आला असून या रकमेत इतर कामेदेखील केली जाणार आहेत. वांद्रे स्थानकाचे सौंदर्यीकरण करण्यात येणार आहे. या स्थानकात लाकडी आसने बसविण्यात येणार आहेत. यासह वांद्रे स्थानक रात्रीच्या वेळी चकचकीत दिसण्यासाठी कंदिलांच्या स्वरूपात एलईडी दिवे लावण्याचे नियोजन केले आहे. हे काम पुढील सहा ते
आठ महिन्यांत पूर्ण करण्यात येणार आहे. पर्यटकांच्या दृष्टीने वांद्रे स्थानक आकर्षक केंद्रबिंदू आहे. वांद्रे स्थानकाला नवीन झळाळी दिल्याने येथे पर्यटकांची गर्दी वाढण्याची शक्यता आहे, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.
वांद्रे स्थानकाला ग्रेड ए वन ऐतिहासिक वारसा लाभला आहे. त्यामुळे या वास्तूला कोणताही धक्का न पोहोचता या स्थानकाचे काम केले जाणार आहे. सीएसएमटी स्थानकालासुद्धा ए वनचा ऐतिहासिक वारसा लाभला आहे. सीएसएमटी स्थानकाच्या मुख्य इमारतीला झळाळी देण्याचे काम सुरू आहे.
अशीच झळाळी आता वांद्रे स्थानक आणि वांद्रे टर्मिनसला देण्यात येणार आहे. त्यामुळे येथे पर्यटकांची संख्या वाढणार आहे.