Join us

वांद्रे वर्सोवा सी लिंकला लागणार ४ चॉंद,सागरी सेतूवर ऑर्थोट्रोपिक स्टील डेक बसविणार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 29, 2024 9:49 AM

मच्छीमारांच्या जहाजांना सहज ये-जा शक्य.

अमर शैला, मुंबई : वांद्रे वर्सोवा सागरी सेतू प्रकल्पाच्या आराखड्यात महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) बदल केला आहे. त्यानुसार आता या सागरी सेतूवर एकूण चार ऑर्थोट्रोपिक स्टील डेक (ओएसडी) स्पॅन बसविण्यात येणार आहेत. संपूर्णपणे स्टीलपासून बनविण्यात आलेल्या या गर्डरमुळे पुलाच्या दोन खांबांतील अंतर सुमारे १२० मीटरने वाढविता येणार आहे. त्यातून मच्छिमारांच्या जहाजांना सहजरीत्या ये-जा करणे शक्य होणार आहे. त्याचबरोबर एमएसआरडीसीने जुहू आणि वर्सोवा येथील कनेक्टरचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला असून त्यातून या सागरी सेतूवरून येणाऱ्या वाहनांना विनाअडथळा पश्चिम द्रुतगती महामार्गावर पोहचणे शक्य होणार आहे. 

एमएसआरडीसीकडून वांद्रे ते वर्सोवा असा १७.७ किलोमीटर लांबीचा सागरी सेतू बांधण्यात येत असून त्यावर एकूण ८ मार्गिका असतील. यातील मुख्य सागरी सेतू ९.६० किमी लांबीचा असून तो समुद्रात ९०० मीटर आतमध्ये उभारला जाणार आहे. या प्रकल्पासाठी सुमारे १८ हजार ६२५ कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. 

ओएसडीची वैशिष्ट्ये :

नेहमीच्या गर्डरमुळे पुलाच्या दोन खांबांतील अंतर साधारणपणे ३० मीटर ते ६० मीटरपर्यंत असते. मात्र या स्टीलपासून बनविण्यात आलेल्या या डेकमुळे दोन खांबांतील अंतर १२० मीटरपर्यंत वाढविणे शक्य होते. नुकत्याच खुल्या झालेल्या अटल सेतूवर हा ओएसडी स्पॅन सर्वप्रथम वापरण्यात आला होता.

पश्चिम द्रुतगती मार्गापर्यंत विस्तार :

१)  वांद्रे वर्सोवा सागरी सेतूवरून येणाऱ्या वाहनांना पश्चिम द्रुतगती मार्गावर विनाअडथळा पोहचता यावे यासाठी जुहू आणि वर्सोवा येथील कनेक्टरचा विस्तार केला जाणार आहे. 

२)  जुहूतील कनेक्टर गझधरबंद येथून पुढे जुहू तारा रोडनजीक दौलतनगर जंक्शनला जोडला जाणार, या कनेक्टरचा सुमारे १२५० मीटरने विस्तार केला.

३)  वर्सोवा येथील कनेक्टर यापूर्वी नाना-नानी पार्कजवळ येणार होता. मात्र या कनेक्टरमुळे परिसरात वाहतूक कोंडीची शक्यता होती. त्यामुळे आता वर्सोवा कनेक्टरचा विस्तार जुहू वर्सोवा लिंक रस्त्यावरील वृंदावन गुरुकुलपर्यंत केला 

एमएसआरडीसीने वाढीव खर्चाचा प्रस्ताव मंजुरीसाठी राज्य सरकारकडे पाठविला आहे. सागरी सेतूच्या आराखड्यात काही बदल केले आहेत. सागरी सेतूच्या यापूर्वीच्या आराखड्यानुसार उभारण्यात येणाऱ्या पुलाच्या खांबांमुळे मच्छिमारांना समुद्रात ये-जा करण्यात अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्यामुळे दोन खांबांमधील अंतर वाढविण्याची मागणी मच्छिमारांनी केली होती. पुलाच्या खांबांतील अंतर वाढविण्याचा निर्णय घेतला असून जुहू कनेक्टरच्या परिसरात ओएसडी प्रकारातील चार गर्डरची उभारणी केली जाणार आहे.

टॅग्स :मुंबईराज्य रस्ते विकास महामंडळ