वांद्रे ते विरार एसी लोकल?
By admin | Published: October 24, 2016 04:36 AM2016-10-24T04:36:48+5:302016-10-24T04:36:48+5:30
मुंबईत दाखल झालेली एसी लोकल पुढील वर्षातच धावणार असली तरी ही लोकल नक्की धावणार कुठे, असा सवाल उपस्थित होत आहे.
मुंबई : मुंबईत दाखल झालेली एसी लोकल पुढील वर्षातच धावणार असली तरी ही लोकल नक्की धावणार कुठे, असा सवाल उपस्थित होत आहे. पश्चिम रेल्वेवर एसी लोकल चालविण्यासाठी पश्चिम रेल्वेकडून सर्वेक्षणही केले जात आहे. यामध्ये एसी लोकलची जास्त असलेली उंची आणि चर्चगेट ते माहीमदरम्यान दहा ठिकाणी पादचारी पूल व ओव्हरहेड वायरची कमी असलेली उंची यामुळे एसी लोकल धावण्यास अडथळा असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे ही लोकल वांद्रे ते विरार धावू शकते का, यावर पश्चिम रेल्वेकडून चाचपणी सुरू आहे.
मध्य रेल्वेकडून एसी लोकल चालविण्यासाठी चाचपणी केली जात असतानाच पश्चिम रेल्वेनेही चाचपणी सुरू केली आहे. यासंदर्भात रेल्वेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, चर्चगेट ते माहीमदरम्यान जवळपास दहा ठिकाणी कमी उंची असल्याने एसी लोकल चालविण्यास अडथळा निर्माण झाले आहेत. यात चर्चगेट ते महालक्ष्मीदरम्यान सर्वांत जास्त ठिकाणे असून, त्यांची संख्या ९ एवढी आहे. तर माहीम येथे दोन ठिकाणे कमी उंचीची आहेत. कमी उंचीचे पूल आणि ओव्हरहेड वायर यामुळे एसी लोकल धावण्यास तांत्रिक अडचण आहे. यातील सहा ते सात ठिकाणांची असलेली अडचण ही सोडविण्यात येतील. मात्र अन्य ठिकाणी असलेल्या अडचणी या खूप मोठ्या आहेत. तरीही त्या कशा सुटू शकतील यावर विचार केला जात असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे रेल्वे बोर्डाने आदेश दिल्यास वांद्रे ते विरार पट्ट्यातच एसी लोकल चालविली जाईल, असेही स्पष्ट केले. (प्रतिनिधी)