वांद्रेत एमटीएनएल १० दिवस ‘डेड’; इमारतीच्या आगीचा परिणाम
By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2019 04:47 AM2019-07-23T04:47:47+5:302019-07-23T06:30:26+5:30
या कार्यालयात प्रशासकीय कार्यालय, टेलिफोन एक्स्चेंज, डिव्हिजन कार्यालय यांचा समावेश आहे. त्यामुळे सुमारे २५० पेक्षा जास्त कर्मचारी या ठिकाणी कार्यरत असतात.
मुंबई : वांद्रे पश्चिम येथील एमटीएनएल इमारतीला लागलेल्या आगीमुळे एमटीएनएल प्रणालीचे मोठे नुकसान झाले असून, या परिसरातील सुमारे ३२ हजारांपेक्षा अधिक जोडण्यांवर त्याचा प्रतिकूल परिणाम झाला आहे. एमटीएनएलचे पश्चिम १ विभागाचे मुख्यालय असलेल्या या ९ मजली इमारतीमधील कार्यालयाला लागलेल्या आगीमुळे एमटीएनएलचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती एमटीएनएलच्या अधिकाऱ्यांनी दिली. महाव्यवस्थापक, उप महाव्यपस्थापकांचे कार्यालय याच इमारतीत आहे. एमटीएनएलची सेवा पूर्ववत होण्यासाठी किमान १० दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
या कार्यालयात प्रशासकीय कार्यालय, टेलिफोन एक्स्चेंज, डिव्हिजन कार्यालय यांचा समावेश आहे. त्यामुळे सुमारे २५० पेक्षा जास्त कर्मचारी या ठिकाणी कार्यरत असतात. दुपारी जेवणाच्या सुटीनंतर ही आग लागल्याने जवळपास सर्वच अधिकारी, कर्मचारी कार्यालयात कार्यरत होते. तिसºया मजल्यावर आग लागल्याचे समजताच ज्यांना खाली उतरणे शक्य होते ते खाली उतरून इमारतीबाहेर आले. मात्र तिसºया मजल्यावरील काही कर्मचारी व त्यावरील मजल्यांमधील कर्मचारी, अधिकारी सुरक्षिततेचा उपाय म्हणून गच्चीवर गेले. या आगीमुळे वांद्रे पश्चिम विभागातील एमटीएनएलच्या सर्व जोडण्या बंद झाल्या आहेत. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला असला तरी नेमके कारण चौकशीनंतरच कळेल असे सांगण्यात आले.
टेलिफोनच्या केबलना आग लागल्याने मोठे नुकसान झाले आहे. एक एक्स्चेंज उभे करायला किमान कोट्यवधी रुपये खर्च करावे लागतात त्यामुळे एक्स्चेंजचे किती नुकसान झाले आहे हे आताच ठामपणे सांगता येणार नाही, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. या कार्यालयाच्या माध्यमातून परिसरात लँड लाइन, लीज लाइन, ब्रॉडबँड सेवा पुरविली जाते.
एक्स्चेंजमध्ये मोठी तांत्रिक क्षमता असलेल्या विदेशी यंत्रणेचा वापर करण्यात आला आहे. त्याला आगीमुळे धोका पोहोचल्याची भीती आहे. त्यामुळे नुकसानीचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. या परिसरातील जोडण्या पूर्ववत होण्यासाठी किमान दहा दिवस लागण्याची शक्यता आहे. दुसºया एक्सचेंजवरून लाइन घेऊन या जोडण्या सुरू करण्यासाठीदेखील किमान २ ते ३ दिवस लागतील त्यामुळे या कालावधीत या परिसरातील एमटीएनएलची सेवा बंद राहणार असल्याची माहिती देण्यात आली. आगीमुळे झालेले नुकसान मोठे असल्याने एमटीएनएलच्या मुंबईतील इतर भागातील अधिकारी व कर्मचारी या ठिकाणी वळवून काम पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, ही इमारत ३० ते ३५ वर्षे जुनी असून या इमारतीत अग्निशमन प्रतिबंधक यंत्रणा कार्यान्वित होती. मात्र आगीचे प्रमाण मोठे असल्याने त्याचा फारसा परिणाम झाला नाही असे सांगण्यात आले.
आवश्यक बाबींची पूर्तता
सद्य:स्थितीत आगीवर नियंत्रण मिळविणे हीच आमची प्राथमिकता आहे. या परिसरातील ३० हजारांपेक्षा अधिक जोडण्यांवर किती परिणाम होईल व त्या पूर्ववत कधी होतील याबाबत आताच सांगणे कठीण आहे. नेमके किती नुकसान झाले आहे हे तपासल्यावर पुढील बाबी स्पष्ट होतील. या इमारतीत आवश्यक त्या बाबींची पूर्तता केलेली आहे. आगीची घटना दुर्दैवी आहे. - नीता असपात, महाव्यवस्थापक, पश्चिम - १, एमटीएनएल, मुंबई.
सेवा सुरळीत करण्यास प्राधान्य
ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. चौकशीनंतर नेमकी ही आग कशामुळे लागली हे समोर येईल. अद्याप त्याबाबत काहीच माहिती मिळालेली नसल्याने सद्यस्थितीत कोणावर दोषारोप करणे चुकीचे ठरेल. सेवा सुरळीत होण्यास आमचे प्राधान्य असून, त्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करण्यात येतील. नागरिकांनीदेखील यासाठी सहकार्य करावे. - दिलीप जाधव, सरचिटणीस, महानगर टेलिफोन निगम कामगार संघ, मुंबई.
दुु:खद घटना
एमटीएनएल आर्थिक संकटातून जात असताना अशी घटना घडणे हे कर्मचाºयांसाठी मोठी दु:खद घटना आहे. मात्र, कर्मचारी सुरक्षित राहिले, ही आनंदाची बाब आहे. या प्रकरणी कोणतेही आरोप-प्रत्यारोप करण्याऐवजी सेवा सुरू करण्याला प्राधान्य आहे. ग्राहकांना लवकरात लवकर सेवा पुरविण्यासाठी आम्ही कार्यरत आहोत. - किशोर केदारे, उपाध्यक्ष, एमटीएनएल वर्कर्स युनियन.