मुंबई : एकाच आयुष्यात दोनदा हृदय प्रत्यारोपणाचा अनुभव हा आधुनिक वैद्यकशास्त्रातील चमत्कारच. बंगळुरू येथील रीना राजू यांनी हा अनुभव घेतला आहे. दोनदा हृदय प्रत्यारोपण करण्यात आलेल्या रीना या भारतातील एकमेव व्यक्ती आहेत. त्यांची नोंद लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्येही झाली आहे. मात्र, आपल्या वाट्याला आलेला हा जगावेगळा अनुभव त्यांनी हृदयाशी घट्ट धरून न ठेवता उलटपक्षी असाच अनुभव येणाऱ्या लोकांना आयुष्यभरासाठी जी औषधे लागतात त्यांचा पुरवठा करण्यासाठी स्वयंसेवी संस्था त्यांनी उभारली. १३ वर्षांपूर्वी रीना यांचे पहिले हृदय प्रत्यारोपण झाले. त्यानंतर त्यांनी अवयवदानाविषयी जनजागृती करण्यासाठी ‘लाइट अ लाइफ - रीना राजू फाउंडेशन’ ही संस्था स्थापन केली. एकीकडे संस्थेच्या माध्यमातून जनजागृतीचे काम सुरू असताना रीना यांनी क्रीडा प्रकारांत सहभाग घेणे सुरू ठेवले. त्यातूनच २०१९ मध्ये लंडन येथे झालेल्या जागतिक प्रत्यारोपण खेळात भारतीय संघाबरोबर त्या व्यवस्थापक म्हणून गेल्या. त्या स्पर्धेत भारताने चार सुवर्ण आणि तीन रौप्य पदकांची कमाई केली. स्पर्धेत सहभागी झालेल्या १४ खेळाडूंपैकी तीन खेळाडूंनी अवयवदान केले होते, तर उर्वरित ११ जणांना अवयव मिळाले होते. या सर्व स्पर्धेचे नियोजन रीना यांच्या फाउंडेशनने केले होते.
याबाबत अधिक माहिती देताना रीना सांगतात, "पहिल्या प्रत्यारोपणानंतर मी माझ्या संस्थेमार्फत काम चालू केले होते. गरीब आणि गरजू रुग्णांना शक्य होईल तेवढी मदत करत होते. सगळे काही छान सुरू असताना २०१७ साली पुन्हा हृदयाचा त्रास जाणवू लागला. हृदय प्रत्यारोपण केलेल्या व्यक्तीला हृदयाचा आजार होतो, हे ठाऊक होते. त्यामुळे चेन्नईतील डॉक्टरांशी संपर्क साधला. कारण माझी पहिली हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया तिथेच झाली होती. चेन्नईतील डॉक्टरांनी पुन्हा हृदय प्रत्यारोपण करण्याचा सल्ला दिला. मला ब्रह्मांड आठवले. पहिल्या प्रत्यारोपणावेळी झालेला त्रास आणि वेदना, ते ऑपरेशन थिएटर, अवयवदाता मिळण्यासाठी पाहावी लागणारी वाट या सगळ्या प्रक्रियेला पुन्हा सामोरे जावे लागेल, ही भीती दाटून आली. परंतु प्राप्त परिस्थितीला सामोरे जाण्यावाचून गत्यंतर नव्हते. अखेरीस दुसऱ्या प्रत्यारोपणाचा निर्णय घेतला."
रीना पुढे म्हणाल्या, "२२ सप्टेंबर २०१७ रोजी दुसऱ्या हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रियेला सामोरी गेले. अशा प्रकारे दोनदा हृदय प्रत्यारोपण होणारी मी एकमेव व्यक्ती असल्याचे रुग्णालयातच समजले. दुसरे हृदय बसवून मी पुन्हा बंगळुरूला परतले आणि माझे काम सुरू केले. मला ज्या अवयवदात्यांकडून हृदय मिळाले त्यांच्या कुटुंबीयांची मी आभारी आहे."
रीना यांच्या संस्थेचे कार्यसंस्थेमार्फत रीना 'परवडणारे हृदय प्रत्यारोपण' आणि औषधे ही मोहीम राबवतात. लोकांना एका प्रत्यारोपणासाठी ३०-३५ लाख खर्च येतो. प्रत्यारोपणानंतर वर्षभरासाठी १.७० ते २ लाख खर्च येतो. दर तीन महिन्यांनी फॉलोअप, दर महिन्याला १५-२० हजारांची औषधे, वर्षातून एकदा हृदयाची बायोप्सी या सगळ्याचाच खर्च एक लाखांपर्यंत येतो. रुग्णांना हे सर्व परवडावे यासाठी आणखी व्यापक प्रमाणात काम करण्याचा रीना यांचा संकल्प आहे. त्यांच्याकडे देशभरातून रुग्ण मदतीसाठी येत असतात त्यात मुंबईच्याही रुग्णांचा समावेश असतो.