बांगलादेशी नागरिकांनी केले लोकसभा निवडणुकीत मतदान!, ‘एटीएस’कडून चौघांना बेड्या

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2024 07:48 AM2024-06-12T07:48:25+5:302024-06-12T07:50:11+5:30

Lok Sabha Election 2024 Result: बनावट कागदपत्रांच्या आधारे भारतीय नागरिक असल्याचे दाखवून अवैध वास्तव्य करणाऱ्या चार बांगलादेशी नागरिकांना राज्य दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) बेड्या ठोकल्या आहेत.

Bangladesh citizens voted in the Lok Sabha elections! Four people were handcuffed by ATS | बांगलादेशी नागरिकांनी केले लोकसभा निवडणुकीत मतदान!, ‘एटीएस’कडून चौघांना बेड्या

बांगलादेशी नागरिकांनी केले लोकसभा निवडणुकीत मतदान!, ‘एटीएस’कडून चौघांना बेड्या

 मुंबई - बनावट कागदपत्रांच्या आधारे भारतीय नागरिक असल्याचे दाखवून अवैध वास्तव्य करणाऱ्या चार बांगलादेशी नागरिकांना राज्य दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) बेड्या ठोकल्या आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, काही बांगलादेशींनी लोकसभा निवडणुकीत मतदान केल्याचे उघड झाले आहे. त्यांच्या अन्य पाच साथीदारांचा शोध सुरू आहे.

गुप्त माहितीच्या आधारे एटीएसच्या जुहू कक्षाने एका बांगलादेशी व्यक्तीला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली. त्यातून अन्य तीन बांगलादेशी घुसखोरांची माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. या चौघांवरही बेकायदा वास्तव्याबाबतचे मुंबईत काही ठिकाणी गुन्हे दाखल आहेत. यांनी सुरत येथे वास्तव्य करीत असल्याचे बनावट पुरावे तयार करून  त्याआधारे तेथूनच पासपोर्ट मिळविल्याची माहिती एटीएस तपासात उघड झाली आहे.

अटकेतील बांगलादेशींच्या आणखी पाच साथीदारांनीही बनावट कागदपत्रांच्या आधारे भारतीय पासपोर्ट मिळवला. इतकेच नव्हे तर  त्यातील एक जण याच पासपोर्टच्या आधारे सौदी अरेबिया येथे नोकरीसाठी गेला आहे. तसेच, काही बांगलादेशी आरोपींनी पासपोर्टच्या आधारे लोकसभा निवडणुकीत मतदान केल्याचेदेखील एटीएसच्या तपासातून स्पष्ट झाले आहे.

बांगलादेशी कसे सुटतात? 
बांगलादेशी व्यक्तींवर भारतात बेकायदा प्रवेश केल्याबद्दल गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांना न्यायालयापुढे उभे करण्यात येते. न्यायालयातून त्यांना जामीन मिळतो. ते बनावट कागदपत्रे तयार करतात. त्या आधारे भारतीय पासपोर्ट मिळवतात आणि अवैध वास्तव्य करतात. नोकरीही मिळवतात, असे स्पष्ट झाले.

 एटीएसने अटक केलेली चौकडी बांगलादेशमधील नौखाली जिल्ह्यातील आहे. त्यापैकी रियाज हुसेन शेख (३३) हा अंधेरीच्या लोखंडवाला, मिल्लतनगर येथे राहत होता. तो या परिसरात इलेक्ट्रिशियन म्हणून काम करीत होता. 
 सुलतान सिद्दीक शेख (५४) हा रिक्षाचालक असून तो मालाड, मालवणीतील अंबुजवाडीमध्ये राहतो. माहूल गावातील म्हाडा कॉलनीमध्ये वास्तव्यास असलेला इब्राहिम शफिउल्ला शेख (४६) हा भाजी विक्रेता आहे. 
 फारूख उस्मानगणी शेख (३९) हा जोगेश्वरी पश्चिमेकडील गुलशन नगरमध्ये वास्तव्यास होता. 

Web Title: Bangladesh citizens voted in the Lok Sabha elections! Four people were handcuffed by ATS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.