पश्चिम रेल्वेच्या सुविधा पाहून बांगलादेशचे शिष्टमंडळ प्रभावित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2019 02:21 AM2019-05-27T02:21:42+5:302019-05-27T02:21:45+5:30
बांगलादेशमध्ये दिव्यांगांसाठी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी येथील दिव्यांगांसाठी असलेल्या विविध सुविधांचा आढावा घेतला, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली.
मुंबई : बांगलादेशच्या सात आणि भारताच्या एक अशा आठ व्यक्तींच्या शिष्टमंडळाने नुकताच पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट आणि मुंबई सेंट्रल स्थानकांचा दौरा केला तसेच बांगलादेशमध्ये दिव्यांगांसाठी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी येथील दिव्यांगांसाठी असलेल्या विविध सुविधांचा आढावा घेतला, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली. या वेळी बांगलादेशच्या शिष्टमंडळात राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे काजी राजुल हक, राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या अध्यक्षांचे खासगी सचिव मोहम्मद राबिबूल इस्लाम, बांगलादेश रेल्वेचे अतिरिक्त महासंचालक-एमएनसीपी नसिरुद्दीन अहमद, बांगलादेश रेल्वे मंत्रालयाचे संयुक्त प्रमुख ए.एन.एम. अजीजुल हक, बांगलादेश रेल्वेचे संयुक्त महासंचालक मोहम्मद मोजूर उल आलम चौधर, बीएआरसीचे गटनेते मोहम्मद मजेदुल इस्लाम बीएआरसीचे पॉलिसी एनालिस्ट मुनमुन हुसैन आणि माय ट्रेन इंटू अभियान मुंबईच्या व्यवस्थापक विराली मोदी उपस्थित होत्या. या शिष्टमंडळाने चर्चगेट स्थानकाला भेट दिली. या वेळी दिव्यांगांसाठी उपलब्ध असलेल्या सुविधा पाहिल्या. सुविधा पाहून शिष्टमंडळ प्रभावित झाले. पश्चिम रेल्वे दिव्यांगांसाठी खूप संवेदनशील आहे. त्यांची पूर्ण काळजी घेते. दिव्यांगांसाठी लिफ्ट, लिफ्टमध्ये ब्रेल इंडिकेटरसह व्हीलचेअर, हॉलमध्ये एक विशेष शौचालय, एक विशेष तिकीट खिडकी आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. याचे शिस्टमंडळाने कौतुक केले आहे. विराली मोदी यांनी रेल्वेने दिव्यांगांना व्हीलचेअरसोबत ईएमयू रेकच्या दिव्यांग डब्यापर्यंत पोहोचण्याच्या समस्यांबाबत उपाययोजना करावी, असे म्हटले आहे.