कामाठीपुऱ्यात बांगलादेशी महिला निघाली लाडकी बहीण योजनेची लाभार्थी; वकिलाचा भारतीय असल्याचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2025 13:13 IST2025-01-23T13:12:24+5:302025-01-23T13:13:58+5:30
मुंबईत बेकायदेशीर वास्तव्यास असलेल्या एका बांगलादेशी महिलेने लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याची माहिती समोर आली आहे.

कामाठीपुऱ्यात बांगलादेशी महिला निघाली लाडकी बहीण योजनेची लाभार्थी; वकिलाचा भारतीय असल्याचा दावा
Ladki Bahin Yojana: देशभरात सध्या बेकायदेशीरित्या भारतात राहणाऱ्या बांगलादेशी नागरिकांविरुद्ध कठोर कारवाई सुरु आहे. मुंबईसह महाराष्ट्रातही अनेक ठिकाणी बेकायदेशीरपणे अनेक बांगलादेशी राहत असल्याचे समोर आलं असून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आहे. भारतात सहजपणे प्रवेश करुन अनेक बांगलादेशींनी इथली कागदपत्रे तयार करुन अनेक वर्षे वास्तव्य केल्याचं उघड झालं आहे. अशातच मुंबईच्या कामाठीपुरा भागातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. गेल्या वर्षी सुरु करण्यात आलेल्या महायुती सरकारच्या महत्त्वांकाक्षी लाडकी बहीण योजनेचा चक्क बांगलादेशी महिलेने लाभ घेतल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी पाच जणांचा अटक करण्यात आली असून पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरु आहे.
अनेक बांगलादेशी नागरिक बेकायदेशीरपणे भारतात प्रवेश करत असल्याच्या समोर आलं आहेत. काही दिवसांपूर्वी पुण्यात एका बांगलादेशी नागरिकाला पुणे पोलिसांनी अटक केली होती. आरोपी गेल्या २० वर्षांपासून भारतात राहत होता. त्याने बेकायदेशीरपणे भारत-बांगलादेश सीमा ओलांडली आणि कोलकाता येथे त्याचे जन्म प्रमाणपत्र बनवले. यानंतर तो अहमदाबाद आणि मुंबईमार्गे पुण्यात पोहोचला. या आरोपींकडे भारतीय आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट आदी कागदपत्रेही सापडली होती. त्यानंतर आता मुंबईत लाडकी बहीण योजनेची लाभ घेणारी बांगलादेशी महिला सापडली आहे.
मुंबईत एका बांगलादेशी महिलेने लाडकी बहीण योजनेचा फायदा घेतल्याचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. मुंबईतील कामाठीपुरा भागात राहणाऱ्या या बांगलादेशी महिलेने लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केला होता आणि तिला सरकारकडून लाभही मिळाला होता. मुंबई पोलिसांच्या कारवाईत ही धक्कादायक माहिती समोर आली. या प्रकरणी पोलिसांनी महिलेसह ५ बांगलादेशी नागरिक आणि एका दलालाला अटक केली आहे. पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. या घटनेमुळे लाडकी बहीण योजनेच्या पारदर्शकतेवर प्रश्न उपस्थित होत आहेत.
क्राइम इंटेलिजेंस युनिटने कामाठीपुरा भागात ही कारवाई केली. अटक करण्यात आलेल्यांमध्ये तीन महिलांचा समावेश आहे. बांगलादेशी नागरिकांना बेकायदेशीर स्थलांतर करण्यास मदत केल्याबद्दल आणि त्यांना आश्रय दिल्याबद्दल महादेव यादव या ३४ वर्षीय भारतीयालाही याप्रकरणात अटक करण्यात आली आहे. ताब्यात घेतलेल्या एका महिलेचं नाव उर्मिला खातून असं असून तिने लाडकी बहीण योजनेअंतर्गत १५०० रुपयांचे दोन हप्ते मिळवले असल्याचे समोर आलं आहे. या बांगलादेशी महिलेचे आधारकार्ड बनावट असल्याचा दावा केला आहे.
हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार, उर्मिला खातून यांच्या वतीने बाजू मांडणाऱ्या वकील सुनील पांडे यांनी अजब दावा केला आहे. "उर्मिला खातून ही भारतीय आहे आणि तिच्याकडे ते सिद्ध करण्यासाठी सर्व कागदपत्रे आहेत. लाडकी बहीण योजनेचे दोन हप्तेही तिच्या बँक खात्यात जमा झाले आहेत. त्यामुळे ती भारतीय नागरिक असल्याचे सिद्ध होते," असा दावा वकील सुनील पांडे यांनी केला आहे.