बनावट पासपोर्टवर बांगलादेशीनी केले लोकसभा निवडणुकीत मतदान

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2024 08:06 PM2024-06-11T20:06:23+5:302024-06-11T20:06:39+5:30

चार बांगलादेशींना अटक,  एटीएसची कारवाई.

Bangladeshis voted in the Lok Sabha elections on fake passports | बनावट पासपोर्टवर बांगलादेशीनी केले लोकसभा निवडणुकीत मतदान

बनावट पासपोर्टवर बांगलादेशीनी केले लोकसभा निवडणुकीत मतदान

मनीषा म्हात्रे, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : बनावट कागदपत्रांच्या आधारे भारतीय पासपोर्ट मिळवून देशात अवैध वास्तव्य करणाऱ्या चार बांगलादेशी नागरिकांना राज्य दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) बेड्या ठोकल्या आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, या बांगलादेशींनी याच पासपोर्ट आधारे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मतदान केल्याचे उघड झाले आहे. तसेच, त्यांच्या अन्य पाच जणांचा एटीएसकडून शोध सुरू आहे.

एटीएसने दिलेल्या माहितीनुसार, गुप्त माहितीवरुन जुहू कक्षाने एका बांगलादेशी व्यक्तीला ताब्यात घेत त्याची कसून चौकशी केली. त्यात बांगलादेशी व्यक्तींवर भारतात प्रवेश केल्याबाबत गुन्हा दाखल झाल्यानंतर न्यायालयाच्या आदेशाने ते जामीनावर बाहेर पडतात. त्यानंतर ते बनावट कागदपत्राच्या आधारे भारतीय पासपोर्ट मिळवून भारतात अवैध वास्तव करतात. तसेच, या पासपोर्टच्या मदतीने विदेशात नोकरी मिळवत असल्याचे स्पष्ट झाले.

एटीएसच्या जुहू कक्षाने याप्रकरणी गुन्हा नोंदवत आणखी तिघांना बेड्या ठोकल्या. अटक बांगलादेशी नागरिकांवर बेकायदेशीर रित्या भारतात वास्तव्य करत असल्याबाबत मुंबईत गुन्हे दाखल आहेत. त्यांनी सुरत, गुजरात येथे वास्तव्यास असल्याचे पुरावे मिळवून त्याआधारे सुरत, गुजरात येथुन पासपोर्ट मिळविल्याची माहिती एटीएस तपासात उघड झाली आहे.

अटक बांगलादेशींच्या आणखी पाच साथीदारांनीसुद्धा बनावट कागदपत्रांच्या आधारे पासपोर्ट मिळवले असून यातील एक आरोपी भारतीय पासपोर्टच्या आधारे सौदी अरेबिया येथे नोकरीसाठी गेला आहे. तसेच, काही बांगलादेशी आरोपींनी पासपोर्टच्या आधारे लोकसभा निवडणुक दरम्यान मतदान केल्याचे देखील एटीएसच्या तपासात समोर आले आहे. अटक आरोपींचा दहशतवादी कृत्यांशी काही संबंध आहे का, या बाबत अधिक चौकशी सुरू आहे. 
 
मुंबईत बनले रिक्षाचालक, इलेक्ट्रिशियन अन्...

एटीएसने अटक केलेली चौकडी बांगलादेशमधील नोवाखाली जिल्ह्यातील आहेत. यात हृदयनगरचा रहिवासी असलेला रियाज हुसेन शेख (३३) हा अंधेरी पश्चिमेकडील लोखंडवाला, मिल्लतनगर येथे वास्तव्यास होता. तो या परिसरात इलेक्ट्रिशियन म्हणून काम करायचा. तर, सिनोदीचा रहिवासी असलेला सुलतान सिध्दीक शेख (५४) हा रिक्षाचालक असून तो मालाड, मालवणीतील अंबुजवाडीमध्ये राहतो. माहूल गावातील म्हाडा कॉलनीमध्ये वास्तव्यास असलेला इब्राहिम शफिउल्ला शेख (४६) हा भाजी विक्रेता असून तो बांगला देशातील साहेबर हाटचा रहिवासी आहे. तर, कबीर हाटचा रहिवासी फारूख उस्मानगणी शेख (३९) हा जोगेश्वरी पश्चिमेकडील गुलशन नगरमध्ये वास्तव्यास होता.

Web Title: Bangladeshis voted in the Lok Sabha elections on fake passports

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई