मुंबई : रात्री उशिरा रस्त्यावर सुरू असलेल्या चहा, खाद्यपदार्थांच्या स्टॉल्सवरील कारवाईदरम्यान बांगुरनगर पोलिसांना धक्काबुक्की करण्यात आली. रविवारी रात्री हा प्रकार घडला. या प्रकरणी जाहिरात कलाकार विशाल किल्लेदार (३३) याच्यासह तिघांना अटक करीत त्याच्या मैत्रिणीला नोटीस देण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.मालाड पश्चिमच्या एजंटस् जॅक पबमध्ये किल्लेदार आणि त्याची मैत्रीण दीपाली मोरे हे मॅच पाहण्यासाठी गेले होते. मृत पोलीस अधिकारी विलास मोरे यांच्या पत्नी दीपाली यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या माहितीनुसार, मॅच संपल्यानंतर रात्री दोनच्या सुमारास इन आॅरबीट मॉलसमोर त्या भुर्जीपाव खाण्यासाठी किल्लेदारसह गेल्या. त्याचवेळी बांगुरनगर पोलिसांची गाडी तेथे आली आणि त्यांनी गाडीवर कारवाई करत स्टॉल चालकांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी इतक्या उशिरापर्यंत गाड्या सुरू ठेवण्याची परवानगी कोणी दिली, कारवाई करा, असे पोलिसांना सांगितल्याचे दीपाली यांचे म्हणणे आहे. त्यावरून पोलीस, दीपाली व किल्लेदार यांच्यात वाद झाला. तो धक्काबुक्कीपर्यंत गेला. आणखी काही तेथे आले. त्यांनी पोलिसांना विरोध केला. त्यामुळे दीपाली, किल्लेदारसह चौघांना पोलीस ठाण्यात आणण्यात आले.दीपाली आणि किल्लेदार नशेत होते. त्यांनी पोलीस ठाण्यात आल्यावरही शिवीगाळ केली, काही कागदपत्र फाडली, असे पोलिसांचे म्हणणे आहे. किल्लेदारसह, अमित महेश भट, अंकित जितेंद्र गडा यांना अटक केल्याचे बांगुरनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय बाणे म्हणाले. किल्लेदारने अभिनेता टायगर श्रॉफसह एका नामांकित कंपनीच्या शीतपेयाच्या जाहिरातीत, एका हिंदी चित्रपटात काम केले आहे. दीपाली यांना पोलिसांनी नोटीस दिली असून, सर्व आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
बांगुरनगर पोलिसांना धक्काबुक्की; जाहिरात कलाकारासह तिघांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2019 2:56 AM