Join us

बँक स्टेटमेंटच्या नादात बँक खातेच झाले रिकामी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 4:06 AM

मलबार हिल येथील गृहिणीची साडेचार लाखांना फसवणूकमलबार हिल येथील गृहिणीची लाखोंची फसवणूकलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : बँक ...

मलबार हिल येथील गृहिणीची साडेचार लाखांना फसवणूक

मलबार हिल येथील गृहिणीची लाखोंची फसवणूक

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : बँक स्टेटमेंटसाठी गुगलवरून बँकेचा हेल्पलाइन क्रमांक शोधून संपर्क साधणे भलतेच महागात पडले आहे. यामध्ये गुगलवरील ठगांनी महिलेच्या खात्यातील साडेचार लाख रुपयांवर हात साफ केला आहे. याप्रकरणी मलबार हिल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

माऊंट प्लेझंट रोड परिसरात ५४ वर्षीय तक्रारदार कुटुंबीयासोबत राहतात. १६ सप्टेंबर रोजी बँक स्टेटमेंटसाठी त्यांनी गुगलवरून बँकेचा हेल्पलाइन क्रमांक मिळवला. संबंधित क्रमांकावर संपर्क साधून बँक स्टेटमेंटची मागणी केली. संबंधिताने त्यांना लिंक पाठवून त्यात तपशील भरण्यास सांगितले. त्याच्यावर विश्वास ठेवून त्यांनी नेट बँकिंगचा युजर आयडी, पासवर्ड तसेच मोबाइलवर आलेले ओटीपी शेअर केले. पुढे बँक खात्यातून वेगवेगळ्या व्यवहारात खात्यातून ४ लाख ५६ हजार ८९० रुपये काढल्याचा संदेश मोबाइलवर आला. त्यांनी याबाबत कॉलधारकाकडे विचारणा करताच बँक स्टेटमेंट अपडेट होत असल्याचे सांगितले. यात फसवणूक झाल्याचा संशय येताच त्यांनी बँकेत धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार, पोलिसांनी गुरुवारी गुन्हा नोंदवत अधिक तपास करण्यास सुरुवात केली, त्यावेळी ही धक्कादायक बाब समोर आली.

गुगलची गुगली

गुगलच्या सर्च इंजिनवर काहीही शोधणे सहज शक्य आहे. सर्व तपशील अचूक असावे यासाठी गुगलने सजेस्ट ॲन एडिट हा पर्याय दिला. त्याद्वारे तपशील बदलता येतो. ऑनलाइन ठगांनी हा पर्याय वापरून बँकांसह शासकीय, खासगी आस्थापना, हॉस्पिटल, हॉटेलचा अधिकृत संपर्क क्रमांक खोडून स्वत:चा मोबाइल क्रमांक गुगलवर देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे समोरून बोलणारी व्यक्ती बँक, ग्राहक सेवा केंद्रातील अधिकारी असे भासवून वापरकर्त्यांशी संवाद साधत फसवणूक केली.

वृद्ध तसेच उच्चशिक्षित ठरताहेत सॉफ्ट टार्गेट

ठग मंडळी बँकेचे कार्ड ब्लॉक होईल, अशी भीती घालून बँक खाते, डेबिट-क्रेडिट कार्डच्या तपशिलाची मागणी केली. खातेदारांकडून माहिती मिळताच त्याआधारे ऑनलाइन ठग संबंधितांच्या खात्यातून परस्पर पैसे काढले. सध्या दिवसाआड अशा स्वरूपाच्या घटना घडत आहेत. वृद्धांसह उच्चशिक्षित मंडळी याच्या शिकार ठरत आहेत. त्यामुळे नागरिकांनीच याबाबत सतर्क होणे गरजेचे आहे.