Join us  

सायबर ठगांच्या "खाकीचा धाकात" बँक खाते होताहेत रिकामे

By मनीषा म्हात्रे | Published: June 09, 2024 5:38 PM

घाटकोपर परिसरात राहणारे सुनील गुप्ता (४१) यांच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुप्ता यांना २ जून रोजी  व्हॉटसअपवर एक व्हिडीओ कॉल आला.

मुंबई : सायबर भामटे फसवणुकीसाठी वेगवेगळे फंडे वापरत असताना, त्यांनी फसवणुकीसाठी खाकीचा आधार घेतल्याचे दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांत पोलिसांच्या गणवेशात व्हिडीओ कॉल करून मनी लॉंड्रींगच्या गुन्ह्यात अडकविण्याची भीती घालून फसवणूक सुरु असल्याच्या घटना डोकेवर काढत आहे. घाटकोपरमधील एका कॉलेज मधील कर्मचाऱ्याला देखील अशाच प्रकारे एक लाखांना गंडविले असून, घाटकोपर पोलीस अधिक  तपास करत आहे.

घाटकोपर परिसरात राहणारे सुनील गुप्ता (४१) यांच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुप्ता यांना २ जून रोजी  व्हॉटसअपवर एक व्हिडीओ कॉल आला. कॉल उचलताच समोर दोघे जण पोलीस गणवेशात दिसून आल्याने त्यांना धक्का बसला. कॉल धारकांनी दिल्ली गुन्हे शाखेतून बोलत असल्याचे सांगून, गुप्ता यांच्या आधारकार्डचा वापर करत अनेक बँक खाते उघल्याचे सांगितले. त्यावरून मनी लाँड्रीग झाल्याने आरबीआयकडूनही त्या व्यवहारांची तपासणी होणार असल्याचे सांगितले. खात्यातील पैशांची तपासणी केल्यानंतर त्यात दोषी आढळल्यास तात्काळ अटकेची कारवाई करण्यात येणार असल्याची भीती घातली.  तसेच,दुसऱ्या दिवशी जॉर्ज म्यथ्यु, आयपीएस अधिकारी कॉल करतील असे सांगून कॉल कट करण्यात आला.  

३ जून रोजी व्हॉट्सअँपवर मॅथ्यू नावाच्या व्यक्तीने व्हिडीओ कॉल केला. त्याने, गुप्ता यांच्या नावाने ६ बँक खाती सुरु असून त्या खात्यांमध्ये काळा पैसा असल्याचे भासवून चौकशी सुरु केली. तपासणीच्या नावाखाली एक लाख पाठविण्यास भाग पाडले. सांगितल्याप्रमाणे अर्ध्या तासांत हे पैसे परत खात्यात न आल्याने त्यांनी याबाबत चौकशी केली  तेव्हा, सर्व्हर खराब असल्याचे कारण सांगत २४ तासांत पैसे जमा होणार असल्याचे आश्वासन दिले. मात्र पैसे जमा न झाल्याने त्यांना संशय आला. त्यांनी, याबाबत भावाला सांगताच त्याने पोलिसांत तक्रार देण्यास सांगितले. अखेर, फसवणूक झाल्याचे स्पष्ट होताच त्याने १९३० वर कॉल करून घाटकोपर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यानुसार, पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा नोंदवत तपास सुरु केला आहे.यापूर्वीची घटनायापूर्वी मनी लॉड्रिंगच्या गुन्ह्यात अटकेची भीती दाखवत गुरुवारी एका फायनान्स कंपानीतील अधिकाऱ्याची ८ लाखांना फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी टिळक नगर पोलिसांनी गुन्हा नोंदवत अधिक तपास करत आहे.काळजी घ्याखातरजमा केलयाशिवाय कुणावरही विश्वास ठेवू नका. संशय आल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधा. अनोळखी व्हिडीओ कॉल उचलणे टाळा. कुणालाही गोपनीय  माहिती शेअर करू  नये. तसेच, असे  व्यवहार टाळा असे आवाहन वेळोवेळी पोलिसांकडून करण्यात येत आहे. 

टॅग्स :सायबर क्राइममुंबईपैसा