'भाजपयुमो'च्या अध्यक्षांचा फोटो पेपरात, बँकेकडून थकबाकीदार घोषित
By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2019 04:44 PM2019-06-06T16:44:19+5:302019-06-06T16:54:58+5:30
बँक ऑफ बडोदाच्या वसुली विभागाद्वारे ही प्रसिद्धी जाहीरात देण्यात आली आहे.
मुंबई - बँक ऑफ बडोदाकडून भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाच्या अध्यक्षांना थकबाकीदार म्हणून घोषित करण्यात आले आहे. मोहित भरतिया असे या अध्यक्षांचे नाव असून त्यांच्यासह जितेंद्र कपूर यांनाही बँकेकडून कोट्यवधी रुपये थकवल्याचे सांगत थकबाकीदार घोषित करण्यात आले आहे. विशेष म्हणजे बँकेकडून वर्तमानपत्रात जाहीरपणे या दोघांचा फोटो छापण्यात आला आहे.
बँक ऑफ बडोदाच्या वसुली विभागाद्वारे ही प्रसिद्धी जाहीरात देण्यात आली आहे. ''तमाम जनतेला सूचित करण्यात येते की, बँक ऑफ बडोदाने त्यातील विहित, रितसर प्रक्रियेचे अनुपालन करुन बँक/आरबीआयचे नियम/नियमावलीनुसार हेतुपुरस्पर कसूरवार म्हणून खालील व्यक्ती घोषित केले आहेत'' असे म्हणत बँकेकडून मोहित भरतिया आणि जितेंद्र कपूर यांचा फोटो वर्तमानपत्रात छापण्यात आला आहे. तसेच, हेतुपुरस्पर कसूरवार म्हणून त्यांना घोषित करण्यासाठी, बँकेचा निर्णय कळविण्यासाठी, कर्जदार यांना रितसर पत्रव्यवहार पाठवला आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दिलेल्या परवानगीनुसार बँक तमाम जनतेला कळविण्यासाठी हेतुपुरसर कसूरवार कर्जदारांचे छायाचित्र प्रकाशित करत आहे, असा मजकूर बँक ऑफ बडोदाकडून संबंधित जाहीरातीमध्ये देण्यात आला आहे.
भरतिया यांनी याबाबत प्रतिक्रिया देताना, अव्यान ऑर्नामेंट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडे बँकेचे कर्ज आहे. मात्र, सद्यस्थिती मी या कंपनीच्या पदावरुन नसून कंपनीच्या संचालकपदाचा मी यापूर्वीच राजीनामा दिल्याचे म्हटले आहे. तसेच 2013 साली झालेल्या या व्यवहारात मी केवळ कंपनीचा गॅरेंटर म्हणून होतो. तसेच मी कंपनीच्या बॅक ड्यू पेड केल्या आहेत, असेही भरतिया यांनी म्हटले आहे. बँकेची एकूण रक्कम 90 कोटी रुपये होती, त्यापैकी 76 कोटी रुपये मी बँकेकडे जमा केल्याचे भरतियांनी सांगितले.
दरम्यान, आयान प्रायव्हेड लिमिटेड या कंपनीची स्थापना 2010 मध्ये करण्यात आली होती. हिरे आणि मनीरत्नांचे कटींग व पॉलिशिंग करण्याचे काम या कंपनीत होत असल्याचेही भरतिया यांनी सांगितले आहे.