मुंबई : दी म्युनिसिपल बँकेच्या मुलुंड शाखेतील साडेतीन कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी अखेर मुलुंड पोलिसांनी कर्मचाऱ्यांचे जबाब नोंदविण्यास सुरुवात केली आहे. तसेच लिपिकाने जरी लेखी स्वरूपात गुन्ह्याची कबुली दिली असली तरी, यामागे आणखी कुणाचा हात आहे का, या दिशेनेही पोलीस तपास करत आहेत. त्यानुसार, संबंधितांवर गुन्हा दाखल करत लवकरच त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात येणार आहे.
बँकेकडूनपोलिसांना देण्यात आलेल्या तक्रार अर्जावरून पोलिसांनी मुलुंड शाखेतील कर्मचाºयांचे जबाब नोंदविण्यास सुरुवात केली आहे. बँकेतील सीसीटीव्ही फुटेज, आॅडिट रिपोर्ट ताब्यात घेण्यात येत आहेत. मुलुंड शाखेत गेल्या दीड वर्षापासून संबंधित लिपिक कार्यरत होता. या दीड वर्षात त्याने विविध खात्यांतून हे पैसे ट्रान्स्फर केले आहेत. यात त्याच्या नातेवाईक, मित्रमंडळींच्या खात्यांचाही समावेश असल्याचे समजते. यापूर्वी त्याने सायन शाखेत काम केले आहे. तेथेही त्याने अशा प्रकारे घोटाळा केला आहे का, आदींबाबतही पुढे तपास होणार आहे.
प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता, लिपिकाचे फोन रेकॉडर््स, त्याचे बँकेचे व्यवहार आदींचा तपशील तपासण्यात येत आहे. जबाबातून समोर आलेल्या माहितीच्या आधारे लवकरच गुन्हा दाखल करत, संबंधित लिपिकावर अटकेची कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवी सरदेसाई यांच्या नेतृत्वाखाली या प्रकरणाची शहानिशा करत सखोल तपाससुरू आहे.
सखोल चौकशीची मागणी
बँक घोटाळ्यातील दोषींना शिक्षा झालीच पाहिजे, अशी मागणी करत काही कर्मचाºयांनी गुरुवारी मुलुंड शाखेबाहेर निदर्शने करत घटनेचा निषेध केला. शिवाय, यात एकाचाच सहभाग नसून, संगनमताने हा घोटाळा झाल्याचा आरोप करत प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, अशीही मागणी करण्यात आली. याबाबत बँकेच्या अधिकाºयांना लेखीपत्रही देण्यात आले आहे.