खाजगीकरणाला विराेध
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या खासगीकरणाला कडाडून विरोध करण्यासाठी बँक कर्मचारी तसेच अधिकाऱ्यांनी दोन दिवसांचा देशव्यापी संप पुकारला आहे. सोमवारी या संपात राज्यातील ५० हजार अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.
युनायटेड फोरम ऑफ बँक युनियनचे निमंत्रक देवीदास तुळजापूरकर म्हणाले, आज देशभरातील एक लाखापेक्षा जास्त बँक शाखांमध्ये काम करणारे १० लाख बँक कर्मचारी तसेच अधिकाऱ्यांनी दोन दिवसांच्या संपाची सुरुवात केली. महाराष्ट्र राज्यात सर्वत्र संप शंभर टक्के पाळण्यात आला. राज्यातील १० हजारांहून जास्त शाखांतून काम करणारे ५० हजारांहून अधिक बँक कर्मचारी आणि अधिकारी या संपात सहभागी झाले होते. यात सर्व सार्वजनिक क्षेत्रातील बँका, १२ जुन्या खाजगी बँका तसेच ५६ प्रादेशिक ग्रामीण बँकांतील सफाई कर्मचारी ते शाखा अधिकारी असे सर्वच सहभागी झाल्यामुळे शाखांचे दरवाजे उघडले गेले नाहीत. या बँकांचा व्यवसाय देशात १५० लाख कोटी रुपयांचा आहे, तर महाराष्ट्रात अंदाजे तीस लाख कोटींचा आहे. युनायटेड फोरम ऑफ बँक युनियनची एक बैठक या आठवड्यात अपेक्षित आहे, ज्यात बँक खासगीकरणाच्या विरोधातील आंदोलन अधिक तीव्र करण्याविषयी निर्णय घेतले जातील, असेही त्यांनी सांगितले.
* व्यवहारांवर परिणाम
संपात सहभागी झालेल्या बँकांचे क्लिअरिंग, कॅश सर्वच व्यवहार बंद होते. दुपारनंतर अनेक एटीएममधील कॅश संपली होती. संपाला छोट्या गावांतूनही चांगला प्रतिसाद मिळाल्याचे चित्र हाेते.
* जमावबंदी असल्याने निदर्शने, धरणे नाही
कोरोनामुळे कर्मचारी एकत्र येण्यास बंधने होती, हे लक्षात घेऊन संपकरी कर्मचाऱ्यांनी मुंबईतील चर्चगेट, सीएसएमटी, अंधेरी स्टेशनवर तीन ते चारच्या गटांत सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून, बँक खासगीकरणाला विरोध व्यक्त करणारे मास्क लावून बँक खासगीकरणाविषयी आपली भूमिका समजावून सांगणारी पत्रके प्रवाशांना वाटली. याशिवाय काही कर्मचाऱ्यांनी आपापल्या शाखांसमोर उभे राहून ही पत्रके बँक ग्राहकांना वाटली. राज्यात सर्वत्र जमावबंदी असल्यामुळे नेहमीप्रमाणे धरणे, निदर्शने करण्यात आली नाहीत.