नवी मुंबई : कोर्टाचे खोटे आदेश बनवून बँक व सोसायटीची फसवणूक करणाऱ्या एका ज्येष्ठ नागरिकास पोलिसांनी अटक केली आहे. विशेष म्हणजे अपहार प्रकरणी शिक्षा भोगल्यानंतर गोठवलेली गेलेली बँक खाती व पेन्शनची रक्कम काढण्यासाठी त्याने कोर्टाचे खोटे आदेश बनवण्याचे धाडस केले.हरिश तुमाने (६०) असे या व्यक्तीचे नाव आहे. स्वेच्छानिवृत्तीनंतर तुमाने हे सीबीडीच्या निलगिरी गार्डन सोसायटीमध्ये मॅनेजर म्हणून नोकरी करत होते. यादरम्यान त्यांनी सोसायटीच्या रकमेत ६३ लाख रुपयांचा अपहार केला होता. सोसायटीच्या मुदतठेवी कागदपत्रांमध्ये फेरफार करून हा अपहार झाला होता. एनकेजीएसबी बँकेत स्वत:चे खाते उघडून त्यामध्ये ही रक्कम फिरवण्यात आली होती. त्यानंतर ही रक्कम आंध्रा बँक, सिंडिकेट बँक येथील खात्यांमध्ये वळवण्यात आली होती. यासंबंधी गुन्हा दाखल होताच पोलिसांनी त्यांची बँक खाती गोठवली होती, तर तुमाने यांना तीन महिन्यांची शिक्षा झाली. त्यानंतर जेलमधून आल्यानंतर त्यांनी थेट कोर्टाचेच खोटे आदेश बनवून बँक व सोसायटीची फसवणूक केली आहे. २२ आॅगस्ट रोजी तुमाने यांनी कोर्टाच्या बनावट आदेशाद्वारे कोपरखैरणे येथील सिंडिकेट बँकेतील गोठवलेले खाते खुले करून घेतले. दुसऱ्या खोट्या आदेशाद्वारे खात्यातील रक्कम वापराकरिता मोकळी केली. हा प्रकार निलगिरी सोसायटीच्या सदस्यांना समजताच त्यांनी यासंदर्भात न्यायालयात चौकशी केली. यावेळी न्यायालयाने असे कोणतेही आदेश जारी केलेले नसल्याचे उघड झाले. त्यानुसार कोपरखैरणे पोलीसांनी तुमाने अटक केली . (प्रतिनिधी)
कोर्टाचे खोटे आदेशपत्र बनवून बँकेची फसवणूक
By admin | Published: November 22, 2014 1:19 AM