Join us  

कल्याणच्या खाडीकिनार्‍यावर शिवरायांनी रोवली मुहूर्तमेढ

By admin | Published: May 26, 2014 4:24 AM

मराठ्यांचा उज्ज्वल इतिहास अभ्यासताना त्यात कल्याण शहराचा उल्लेख आहे

कल्याण : मराठ्यांचा उज्ज्वल इतिहास अभ्यासताना त्यात कल्याण शहराचा उल्लेख आहे. कल्याणच्या खाडीकिनार्‍यावर छत्रपती शिवाजी महाराजांनी आरमाराची मुहूर्तमेढ रोवली, तेव्हा त्यांना येथील आगरी-कोळीबांधवाची मोठी साथ मिळाली. हे देशप्रेम व इतिहास आपण विसरता कामा नये. छत्रपती शिवराय हे खर्‍या अर्थाने रयतेचे राजे होते. याचा आपणा सर्वांनी अभिमान बाळगला पाहिजे, असे कल्याणच्या आगरी, कोळी, मालवणी महोत्सवात ज्येष्ठ कवी संजीवन म्हात्रे यांनी सांगितले. ‘याल तर हसाल’या समाज प्रबोधनपर आगरी कोळी समाजातील चाली, परंपरा, रूढी यावर आधारित विनोदी संगीत कार्यक्रमात ते बोलत होते. पाणी, वीज, वाहतूक समस्या, कौटुंबिक अडचणी, या सर्वांच्या तणावाखाली आपण सतत दबलेले असल्याने माणसाचे हसणेच बंद झाले. हसण्याने माणूस टेन्शन फ्री बनून निरोगी राहतो. यासाठीच आपण हा विनोदी संगीत प्रधान कार्यक्रम तयार केला आहे. आजवर त्याचे १४८ प्रयोग झाले आहेत. ढोलकी, हार्मोनियमच्या साहाय्याने सादरीकरण केलेल्या या कार्यक्रमात संजीवन म्हात्रे यांनी सांगितले की, सध्या ज्ञान मिळविणे ही जीवघेणी स्पर्धा झाली आहे. मुलांच्या शिक्षणावर हजारो रु पये खर्च करूनही या शिक्षणाचे मूल्यमात्र जपले जात नाही. मराठीपेक्षा इंग्रजी शाळात मुलांना घालण्याचा पालकांचा अधिक ओढा असतो. त्यामुळे मराठी शाळा ओस पडतात. त्यातही क्लासला जाण्याची फॅशन झाली आहे. या क्लासमध्ये शिक्षणापेक्षा मुला-मुलींची लफडीच अधिक चालतात. यावर पालकांनी विचार करायची वेळ आली आहे. हे ‘मुलाच्या खांद्यावर वह्यांचे ओझे, बापाच्या खांद्यावर कर्जाचे ओझे’ या गीतातून साभिनय दाखवून दिले. समाजात आजही पोराच्या पाठीवर पोरच पाहिजे, या गीतातून त्यांनी आगरी-कोळी समाजातील कुटुंबाची मानसिकता वर्णन करताना मुले-मुली यांच्या जन्माच्या व्यस्त प्रमाणातून निर्माण होणारी समस्या, तसेच दुसर्‍याशी स्पर्धा करताना कर्ज काढून केले जाणारे विवाह सोहळे, हळदी समारंभात होणार्‍या मद्यपार्ट्यांत अनेकदा किळसवाणे दर्शन घडते. यावर त्यांनी कोरडे ओढतानाच स्त्रियांनी आता स्वरक्षणाचे धडे घेतले पाहिजेत, असे सांगितले. आगरी कोळी समाजात स्त्रियांवर अत्याचार होत नाहीत. कारण हा समाज एक सुसंस्कृत, वात्सल्यपूर्ण भावनेतून जीवन जगत आला आहे. तुमची बहीण सुरक्षित हवी असेल तर दुसर्‍याच्या बहिणीला मान द्यायला हवा. प्रेमप्रकरणातून अनेकांचे आयुष्य बरबाद झाले. चित्रपट दूरदर्शन वाहिन्यांवरील पार्ट्या, प्रेमप्रकरणे यांच्या अनुकरणातून सामाजिक सुरक्षितता धोक्यात येण्याची शक्यता आहे. आपला समाज अशा पार्ट्या कधी करीत नाही, त्यांना प्रोत्साहन देत नाही. कारण ती आपली संस्कृती नाही, हे त्यांनी ‘हळद’ या गीतातून दाखवतानाच लग्नाचा बाजार मांडू नका, मानपानासाठी हट्ट धरू नका, सांपत्तिक स्थिती पाहूनच लग्नकार्यात खर्च करा. केवळ स्पर्धा करण्यासाठी पैसा खर्च करू नका. भोजपुरी म्हणजे ग्रामीण संगीत. हे भोजपुरी संगीत चालते, मग आगरी-कोळी समाजातील उत्तम चाली असलेले अर्थपूर्ण, वात्सल्याने भारलेले, संगीत परंपरा जपणारे संगीत का चालू नये, असा सवाल करून त्यांनी या भावनेतूनच आपण ३५० आगरी कविता लिहिल्याचे सांगितले. (प्रतिनिधी)