बँक मॅनेजरनेच केला बँकेत अपहार
By admin | Published: May 22, 2015 01:11 AM2015-05-22T01:11:07+5:302015-05-22T01:11:07+5:30
बँकेच्या शाखा मॅनेजरनेच बँकेत अपहार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ९५ लाखांच्या या अपहार प्रकरणी एनआरआय पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
नवी मुंबई : बँकेच्या शाखा मॅनेजरनेच बँकेत अपहार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ९५ लाखांच्या या अपहार प्रकरणी एनआरआय पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. कर्जाची बनावट कागदपत्रे स्वीकारून हा अपहार केला.
ओरिएन्टल बँक आॅफ कॉमर्सच्या सीवूड शाखेत हा प्रकार घडला आहे. या ब्रँच मॅनेजरपदी विवेक सुब्रमण्यम हे कार्यरत असताना २०११ ते २०१३ च्या कालावधीत हा अपहार झाला आहे. त्यानुसार बँकेचे जनरल मॅनेजर कृष्णकुमार आचार्य यांनी याबाबतची तक्रार पोलिसांकडे केली आहे. सुब्रमण्यम यांच्यावर ९५ लाख ९० हजार रुपयांच्या अपहाराचा आरोप आहे. सदर बँकेद्वारे २८ जणांना कार लोन देवून हा अपहार झालेला आहे. वाहन खरेदीसाठी ही रक्कम कर्ज स्वरूपात देण्यात आलेली आहे. मात्र संबंधितांची कागदपत्रे बनावट असतानाही त्यांच्या कर्जाला सुब्रमण्यम यांनी मंजुरी दिली. तर कर्ज मंजूर होताच त्या रकमेद्वारे कार खरेदी न करता संबंधितांनी या रकमेचा अपहार केलेला आहे. त्यामुळे कर्जदार व सुब्रमण्यम यांच्या संगनमताने हा प्रकार झाल्याची शक्यता आहे. अखेर दोन वर्षांनी हा प्रकार बँकेसमोर उघडकीस आला. त्यानुसार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. मात्र अद्याप कोणाला अटक झालेली नाही. (प्रतिनिधी)