मुंबई : दिवाळखोर उद्योगपती विजय मल्ल्या आणि त्याच्या किंगफिशर एअरलाइन्सला दिलेल्या कर्जाबाबतची माहिती देण्यास स्टेट बॅँक आॅफ इंडियाने नकार दिला आहे. हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट असल्याने त्याला कर्ज मंजूर करणारे संचालक मंडळ, त्याबाबतच्या प्रस्तावाबाबतचा तपशील देवू शकत नाही, असे त्यांनी कळविले आहे.सुमारे ९ हजार कोटीचे कर्ज बुडवून फरार झालेल्या विजय मल्ल्याकडे स्टेट बॅँक आॅफ इंडियाची मोठी थकबाकी आहे. त्याबाबत माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी बॅँकेकडे मल्ल्याला दिलेले एकूण कर्ज आणि त्यासाठी संचालक मंडळात सादर झालेला आणि मंजूर प्रस्ताव, इतिवृत्तांताची प्रत मागविली होती. मात्र बॅँकेच्या माहिती अधिकाऱ्याने त्यांना कळविले की, हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट असून चौकशी प्राधिकरणाकडे प्रलंबित आहे. त्यामुळे माहितीचा अधिकार अधिनियम २००५ चे कलम ८ (ज) अन्वये माहिती नाकारण्यात येत आहे. दरम्यान, या निर्णयाविरुद्ध त्यांनी प्रथम अपिलकर्त्याकडे धाव घेतली आहे. (प्रतिनिधी)
मल्ल्याच्या कर्जाची माहिती देण्यास बॅँकेचा नकार
By admin | Published: November 18, 2016 2:32 AM