Join us

गोरेगावच्या पालिकेच्या मंडईच्या जागेत थाटली बँक

By मनोहर कुंभेजकर | Updated: January 31, 2025 21:22 IST

सदर जागा परवाना धारक फेरीवाल्यांना देण्यास पालिका प्रशासन अनुकूल, गोरेगाव प्रवासी संघाच्या प्रयत्नांना मिळाले यश

मनोहर कुंभेजकर, मुंबई-गोरेगाव पूर्व ,जयप्रकाश नगरच्या मनीष चेंबर येथील पालिकेच्या नियोजित  मंडईच्या जागेत खाजगी बँक थाटली होती.याबाबत गोरेगाव प्रवासी संघाने अथक पाठपुरावा केल्याने सदर जागा परवाना धारक फेरीवाल्यांना उपलब्ध करून देण्यास पालिका प्रशासन अनुकूल झाले आहे.

विशेष म्हणजे एकीकडे मुंबईत मंडईची जागा कमी असतांना आणि फेरीवाल्यांची समस्या सुटली नाही.सदर जागा एका बँकेला सहकारी भंडारने भाडेतत्त्वावर दिली व सुमारे सहाशे वर्गफूट जागा तळमजला व सुमारे तीन हजार वर्गफूट पहिला मजला व मेझनीन सुमारे तीन हजार फूट दुसरा मजला गेली वीस वर्षं बंद करून ठेवला आहे . आजूबाजूचा परिसर जिथे सुमारे शंभर दुचाकी सहज पार्किंग होऊ शकतील ती जागा सुद्धा बंद करुन ठेवली आहे.याउप्पर सदर जागेचा मालमत्ता कर ( प्राॉपर्टी टॅक्स) व त्यावरील व्याज थकीत ठेवले आहे.

सदर बाबींचा माहिती गोरेगाव प्रवासी संघाचे अध्यक्ष उदय चितळे यांनी पालिका आयुक्त भूषण गगराणी,परिमंडळ ४ चे सहआयुक्त विश्वास शंकरवार,पी दक्षिण विभागाचे सहाय्यक आयुक्त संजय जाधव यांच्याकडे पाठपुरावा केल्याची माहिती गोरेगाव प्रवासी संघाचे अध्यक्ष उदय चितळे यांनी लोकमतला दिली.

सदर जागेची सहाय्यक आयुक्त पी दक्षिण, सहाय्यक अभियंता मंडई विभाग आणि गोरेगाव प्रवासी संघाच्या शिष्टमंडळाने मनीष चेंबरची आज पहाणी केली.सदर जागेत सदर जागा गोरेगाव पश्चिमेला असलेल्या परवानाधारक फेरीवाल्यांना भाडेतत्त्वावर द्यावी याचा सहाय्यक अभियंता पी दक्षिण यांनी पुनरुच्चार केला अशी माहिती चितळे यांनी दिली.

सदर जागेचा घोडे सहाय्यक अभियंता मंडई विभाग हे याबाबत खुलासा करण्यास असमर्थ ठरले.त्यामुळे सहाय्यक अभियंता पी दक्षिण घोडे यांना तात्काळ निर्णय घेऊन मंडई सुरू करण्यात यावी असे सांगितले.तर संघाच्या सर्व नागरिकांनी येथे मंडई हवीच असे म्हणणे लावून धरले.याबाबत फक्त पंधरा दिवसांची मुदत देऊन सहकारी भांडाराला मालमत्ता कर व व्याज भरायला भाग पाडावे असे सर्व नागरिकांनी सांगितले.

अखेर गोरेगाव प्रवासी संघाच्या अथक पाठपुराव्याला यश येवून २० वर्षानी आता या जागेत मंडई आणि पार्किंगची व्यवस्था होणार असल्याने संघाने विश्वास शंकरवार,संजय जाधव,सहाय्यक अभियंता निषाद कुलकर्णी यांचे आभार मानले आहे.

टॅग्स :गोरेगाव