Banking: बँक घोटाळ्याप्रकरणी सीबीआयची मुंबईत १२ ठिकाणी छापेमारी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2022 01:33 PM2022-06-23T13:33:34+5:302022-06-23T13:34:20+5:30
Banking: देशातील सर्वात मोठा बँक घोटाळा म्हणता येईल, अशा तब्बल ३४,६१५ कोटी रुपयांच्या आर्थिक फसवणुकीच्या प्रकरणात सीबीआयने बुधवारी मुंबईतील काही प्रमुख बिल्डरांच्या कार्यालयांवर छापेमारी केली.
मुंबई : देशातील सर्वात मोठा बँक घोटाळा म्हणता येईल, अशा तब्बल ३४,६१५ कोटी रुपयांच्या आर्थिक फसवणुकीच्या प्रकरणात सीबीआयने बुधवारी मुंबईतील काही प्रमुख बिल्डरांच्या कार्यालयांवर छापेमारी केली. दिवाण हाऊसिंग फायनान्स लि.चे मुख्य व्यवस्थापकीय संचालक कपिल वाधवान, कंपनीचे अन्य संचालक तसेच व्यावसायिक सुधाकर शेट्टी यांच्याशी संबंधित १२ कार्यालयांवर छापेमारी करत या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. तसेच छापेमारी दरम्यान काही महत्त्वाची कागदपत्रे ताब्यात घेतली आहेत.
या प्रकरणात पंजाब नॅशनल बँकेचे उप-सरव्यवस्थापक विपीन कुमार शुक्ला यांनी ११ फेब्रुवारी २०२२ रोजी पत्राद्वारे सीबीआयकडे तक्रार दिली होती. या पत्राच्या आधारे सीबीआयने २० जून रोजी एफआयआर दाखल केला. त्यानंतर सीबीआयने बुधवारी छापेमारी केली.
या प्रकरणी दाखल ३३ पानी एफआयआरनुसार, डीएचएफलचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक कपिल वाधवान, संचालक धीरज वाधवान यांनी युनियन बँक ऑफ इंडियाच्या पुढाकाराखाली असलेल्या अन्य १७ बँकांकडून सन २०१० मध्ये ४२ हजार ८७१ कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. त्यांच्या दिवाण हाऊसिंग फायनान्स कंपनीला हे कर्ज मिळाले होते. मात्र, कर्ज प्राप्ती झाल्यानंतर, ही रक्कम कंपनीच्या संचालकांनी त्यांच्या ६६ निकटवर्तीयांच्या कंपन्यांना कर्जापोटी तसेच कंपनी डिपॉझिटच्या नावाखाली दिली. यामध्ये व्यावसायिक सुधाकर शेट्टींसह यापूर्वीच सीबीआयच्या अटकेत असलेले बिल्डर संजय छाब्रिया, अविनाश भोसले यांच्या कंपन्यांचादेखील समावेश आहे.
तसेच, डीएचएफलशी संबंधित कंपन्यांनी या पैशातून अनेक ठिकाणी जमीन तसेच स्थावर मालमत्तांची खरेदी केली. प्राप्त कर्जाच्या रकमेपैकी ३४,६१५ कोटी रुपयांचे कर्जही थकविले.
उपलब्ध माहितीनुसार हे कर्ज प्रकरण सन २०१० मधील आहे. २४ जुलै २०१० रोजी एकूण २९ बँकांच्या समूहाने या कर्जाचे वितरण केले होते. मात्र, यातून १२ बँका बाहेर पडल्या. या प्रकरणात दिले गेलेले कर्ज फेडले जात नसून, कर्जापोटी दिलेल्या रकमेचा अपहार झाल्याची गोष्ट सन २०१९ मधे उजेडात आल्यानंतर या बँकांनी केपीएमजी कंपनीला लेखा परीक्षणासाठी नेमले. या परीक्षणात या कर्ज रकमेचा अपहार झाल्यावर शिक्कामोर्तब झाले.
या प्रकरणी, डीएचएफलचे वाधवान, व्यावसायिक सुधाकर शेट्टी, स्कायलार्क बिल्डकॉन प्रा.लि., दर्शन डेव्हलपर्स प्रा.लि., स्गीता कन्स्ट्रक्शन बिल्डर्स प्रा.लि., टाऊनशिप डेव्हलपर्स प्रा.लि., शिशिर रिएलिटी प्रा.लि., सबलिंक रिअल इस्टेट आदी लोकांचे तसेच कंपन्यांचे तसेच काही सरकारी अधिकाऱ्यांचेही नाव एफआयआरमधे नमूद केलेले आहे.