मुंबई : देशातील बँकांमध्ये डिजिटल सेवा वाढत असतानाच ऑनलाइन सुरक्षेची जबाबदारी बँकांवरच राहील, असे मत राष्ट्रीय ग्राहक आयोगाने व्यक्त केले असून, ग्राहकांना दिलासा दिला आहे. ऑनलाइन फसवणुकीद्वारे पैसे गमावलेल्या ग्राहकाला बँकेने नुकसानभरपाई देण्याचे आदेशही आयोगाने दिले आहेत.
केंद्र सरकारच्या धोरणानुसार बँकांनी डिजिटल व्यवहारांना प्राधान्य दिले आहे, मात्र त्याचवेळी हॅकिंग आणि ऑनलाइन फसवणुकीच्या प्रकारांमध्येही वाढ होत आहे. अशा प्रकरणांमध्ये बँका ग्राहकांना नुकसान भरून देण्यास टाळाटाळ करताना दिसत आहेत. बारा वर्षांपूर्वी एका महिलेच्या खात्यामधील रक्कम ऑनलाइन फ्रॉडद्वारे गहाळ झाली. या महिलेने बँकेकडे तक्रार केली असता, बँकेने नुकसानभरपाई देण्यास नकार दिला. याविरोधात या महिलेने राष्ट्रीय ग्राहक आयोगाचा दरवाजा ठोठावला. या प्रकरणाचा निकाल देताना आयोगाने बँकेच्या यंत्रणेच्या ऑनलाइन सुरक्षेची जबाबदारी बँकांची असून, त्याची नुकसानभरपाई देणे बँकांना बंधनकारक असल्याचे स्पष्ट केले आहे.