Join us

बँकेचे ‘मिसमॅनेजमेंट’, उत्तरे द्यायला बसविला गार्ड

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2023 9:53 AM

वृद्ध, अपंग तासन् तास ताटकळत : एसबीआयच्या कुरार शाखेतील प्रकार

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : स्टेट बँकेच्या कर्मचाऱ्यांच्या मिसमॅनेजमेंटमुळे विनाकारण अडीच ते तीस तास अपंग तसेच वृद्ध खातेधारकांना ताटकळत राहावे लागत आहे. हा प्रकार मालाड पूर्व परिसरात असलेल्या कुरार शाखेमध्ये मंगळवारी पाहायला मिळाला. मुख्य म्हणजे याबाबत लोकमत प्रतिनिधीने बँकेची बाजू विचारण्याचा प्रयत्न केल्यावर कोणीही जबाबदार अधिकारी पुढे न येता बँकेच्या सुरक्षारक्षकालाच त्यांनी प्रवक्ता बनवल्याने खातेधारकांकडून संताप व्यक्त होत आहे.

मालाड पूर्वच्या धनजीवाडीमध्ये ही शाखा आहे. निवृत्तीधारकांना त्यांची पेन्शन दर महिन्याला मिळत राहावी यासाठी आवश्यक असलेले जीवन प्रमाणपत्र रजिस्टर करण्याची ३० नोव्हेंबर ही अंतिम तारीख आहे. त्यामुळे कुरार शाखेत खाते असलेले वृद्ध पेन्शनर हे सकाळपासूनच याठिकाणी येतात. मात्र, बँकेत तासन् तास रखडावे लागत आहे. 

मार्गदर्शक खिडकीच नाही...खाते उघडण्यासाठी, पैसे भरण्यासाठी, कर्ज चौकशीसाठी, पास बुक अपडेटसाठी याठिकाणी येणाऱ्या लोकांना चौकशी करण्यासाठी एकही मार्गदर्शक खिडकी या ठिकाणी नाही. परिणामी सगळा कारभार तिथे उपस्थित असलेला एकमेव सुरक्षारक्षक हाच पाहत असल्याची तक्रार आहे. याठिकाणी गेल्यावर त्यांच्या हातात टोकन दिले जाते. मात्र, तेथे डिस्प्ले करणारे मशीन उपलब्ध नाही.  आम्ही आवाज देऊन टोकनधारकांना बोलवतो, असा खोटा दावाही याठिकाणी केला जात होता. 

टोकन टेकवून घेतला वेळबँकेतून पैसे काढणे किंवा भरण्यासाठी टोकनची आवश्यकता नसतानादेखील प्रत्येकाच्या हातात टोकन देऊन विनाकारण वेळ वाया घालवला जात असल्याचे खातेधारकांचे म्हणणे आहे.

शाखा मॅनेजरही सुट्टीवरतक्रारीबाबत बँकेचे अधिकारी उत्तर द्यायला तयार नव्हते आणि सुरक्षारक्षकाने सिस्टमच स्लो आहे, असे म्हणत विषय टाळायचा प्रयत्न केला. तर शाखा मॅनेजरही सुटीवर असल्याचे सांगण्यात आले.

मी अपंग आहे, बँकेत सकाळी साडेअकरा वाजल्यापासून जीवन प्रमाणपत्रासाठी रांगेत आहे मात्र, दोन वाजत आले, तरीही रांग पुढे सरकत नव्हती. अखेर आम्ही आवाज केल्यावर बँक कर्मचाऱ्यांना जाग आली आणि त्यांनी टोकन नंबर पुकारायला सुरुवात केली. तेव्हा समजले की मधले तीस ते पस्तीस लोक टोकन घेऊन वैतागून घरी निघून गेले होते. त्यांच्यासाठी आम्हाला इतका वेळ बँकेने विनाकारण ताटकळत ठेवले होते. - शुभांगी सावंत, खातेदार 

टोकन मशीन बंद असल्याने या ठिकाणी काहीच ताळमेळ नव्हता. कोणीही मध्येच यायचे आणि रांगेत घुसायचे. आम्ही मात्र आमचा नंबर पुकारतील याची वाट पाहत अडीच ते तीन तास उपाशी थांबून होतो. माझे वय ६४ वर्षे असून, माझ्यासारखे साठी ओलांडलेलेच लोक या ठिकाणी अधिक येतात. आम्हाला वेळेत जेवण, औषध गोळ्या घ्याव्या लागतात. त्यामुळे पेन्शनधारकांसाठी निदान काउंटर तरी वाढवा.- सुवर्णा वलवईकर, खातेधारक, एसबीआय

टॅग्स :मुंबईबँक