मुंबई : सतत आऊट ऑफ कॅश एटीएम असणाऱ्या बँकांना आरबीआयने दणका दिला आहे. एका महिन्यात एखाद्या बँकेचे एटीएम १० तासांपेक्षा अधिक वेळ बंद असल्यास संबंधित बँकेला दहा हजार रुपये दंड आकारण्यात येणार असल्याची घोषणा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने केली आहे. यामुळे एटीएम असूनही पैसे न मिळण्याच्या त्रासातून सर्वसामान्यांची मुक्ती होणार असल्याचे नागरिकांचे मत आहे.
देविदास तुळजापूरकर (सरचिटणीस, महाराष्ट्र स्टेट बँक एम्प्लॉइज फेडरेशन) - एखाद्या एटीएमची कॅश संपली तर एटीएम नेहमी बंद राहते. अनेक ठिकाणी केवळ एका एटीएमवर लोक विसंबून असतात. अशा भागात एटीएम बंद पडल्यास तेथील नागरिकांचे व्यवहार पूर्णपणे ठप्प होतात. त्यामुळे आता निदान कारवाईच्या भीतीने बँका एटीएममध्ये नेहमी कॅश ठेवतील. आरबीआयने घेतलेला निर्णय सर्वसामान्यांच्या फायद्याचाच आहे.
नरेश वाघमारे - अनेकदा तातडीने पैशांची गरज असल्यावर पैसे नसल्याने एटीएममधून रिकाम्या हाती माघारी परतावे लागते. महत्त्वाची कामे अडकून राहतात. अशा अडचणींवर मात करण्यासाठी आरबीआयने योग्य तोडगा काढला आहे.
शिवाली सावंत - काही ठिकाणी नागरिकांना केवळ एका एटीएमवर अवलंबून रहावे लागते. त्यांच्याकडे दुसरा पर्याय नसतो. आरबीआयच्या या निर्णयामुळे अशा बँकांनी येथील एटीएम सेवाच बंद केली तर नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागेल. यासाठी नागरिकांनी अशा बँकांची आरबीआयकडे तक्रार करणे गरजेचे आहे.
दिलावर हसन - अनेकवेळा एटीएमच्या रांगेत कित्येक वेळ घालवून देखील एटीएम आऊट ऑफ सर्व्हिस असल्यामुळे कॅश मिळत नाही. यापुढे आता ही समस्या भेडसावणार नाही. मात्र आता बँकांनी बँकांमधील गर्दी टाळण्यासाठी डिपॉझिट मशीनची संख्या वाढविणे देखील गरजेचे आहे.