मुंबईत भास्कर जाधवांविरुद्ध बॅनरबाजी, शोधून आणणाऱ्याला ११ रू बक्षीस
By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2022 10:12 AM2022-10-20T10:12:26+5:302022-10-20T10:15:32+5:30
भास्कर जाधव विरुद्ध राणे असा सामना रंगल्याचं पाहायला मिळत आहे. आमदार नितेश राणे यांनीही पत्रकार परिषदेत भास्कर जाधव यांच्यावर जोरदार टीका केली होती.
मुंबई - शिवसेना नेते भास्कर जाधव आणि भाजप नेत्यांमध्ये चांगलाच वाद रंगला आहे. जाधव यांनी महाप्रबोधन यात्रेतून राणे कुटुंबीयांवर जोरदार प्रहार केला आहे. शिवसेना नेतृत्त्वावर राणेंकडून सातत्याने हल्लाबोल केला जातो. त्यावरुन, झालेल्या वादातून भास्कर जाधव यांच्या चिपळून येथील बंगल्यावर हल्ला केल्याची घटना बुधवारी मध्यरात्री घडली. या घटनेने शिवसैनिकही आक्रमक झाले आहेत. जोपर्यंत संशयितांना ताब्यात घेतले जात नाही, तोपर्यंत पोलीस स्थानकात ठिय्या मांडून बसण्याचा इशारा दिला आहे. दुसरीकडे मुंबईत भास्कर जाधव यांच्याविरोधात बॅनरबाजी करण्यात आली आहे.
भास्कर जाधव विरुद्ध राणे असा सामना रंगल्याचं पाहायला मिळत आहे. आमदार नितेश राणे यांनीही पत्रकार परिषदेत भास्कर जाधव यांच्यावर जोरदार टीका केली होती. दोन्ही गटातील नेत्यांकडून होत असलेल्या या टीकेमुळेच वातावरण बिघडलं असून घरावर हल्ला करण्यापर्यंत ही बाब केली आहे. त्यातच, भास्कर जाधव यांच्याविरोधात मुंबईत भाजपकडून बॅनरबाजी करत जोरदार टीका केली आहे. भाजपकडून माहीममध्ये आपण यांना पाहिलत का? अशा आशयाचे बॅनर लावले आहेत. तसेच, शोधून आणणाऱ्याला 11 रू बक्षीस, असेही या बॅनरवर लिहिण्यात आले आहे. त्यामुळे, भाजप विरुद्ध ठाकरे गटाचा वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे.
शिवसेनेच्या दसरा मेळाव्यापासून भास्कर जाधव व माजी खासदार नीलेश राणे हे सातत्याने एकमेकांवर टीका करत आहे. सोमवारी चिपळूण येथील भाजपच्या कार्यकर्ता संवाद मेळाव्यात नीलेश राणे यांनी जाधव यांच्यावर टीकेची झोड उठविली. दुसऱ्याच दिवशी सिंधुदुर्ग येथे शिवसेनेच्या एका मोर्चादरम्यान भास्कर जाधव यांनी राणे पिता-पुत्रांचा जोरदार समाचार घेतला. मात्र, त्यानंतर प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी जाधव यांच्याविरुद्ध कुडाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. हे आरोप-प्रत्यारोप सलग सुरू असतानाच बुधवारी मध्यरात्री जाधव यांच्या बंगल्यावर हल्ला झाल्याचा प्रकार घडला. त्यांच्या घराच्या आवारात दगड, पेट्रोलच्या बाटल्या व स्टंम्प आढळल्या आहेत, असे पोलिसांनी सांगितले.
कुडाळमध्ये गुन्हा दाखल
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याबद्दल मानहानीकारक वक्तव्य केल्याची तक्रार भाजपचे दादा साईल यांनी कुडाळ पोलीस ठाण्यात दिली. त्यानुसार आमदार भास्कर जाधव यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे