Join us

‘गडी एकटा निघाला... ८३ वर्षाचा योद्धा...’; शरद पवार समर्थकांची मुंबईत ठिकठिकाणी बॅनरबाजी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 05, 2023 9:46 AM

जास्तीत जास्त आमदार, पदाधिकारी आपल्याकडे असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटाकडून केला जात आहे.

Sharad Pawar Vs Ajit Pawar:राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील फुटीनंतर कुणाकडे किती आमदार, याबाबत सस्पेन्स कायम आहे. शरद पवार आणि अजित पवार गटांकडून वेगवेगळे दावे केले जात आहेत. दोन्ही गटांकडून बोलावलेल्या बैठकीत कुणाकडे किती आमदार याचे चित्र स्पष्ट होऊन कोण ‘पॉवर’बाज हेही स्पष्ट होणार आहे. मात्र, यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या समर्थकांनी सिल्व्हर ओक परिसरात ठिकठिकाणी बॅनरबाजी करत आपला पाठिंबा दर्शवला आहे. 

सिल्वर ओक परिसरासह शरद पवार ज्या मार्गाने वाय. बी. चव्हाण येथे जाणार आहेत. त्या संपूर्ण मार्गावर, ‘गडी एकटा निघाला... ८३ वर्षाचा योद्धा...’ अशा आशयाचे बॅनर लावण्यात आले आहे. तर अजित पवार यांच्या मार्गावर शरद पवार समर्थकांचे बॅनर लागले आहेत. दुसरीकडे, दोघांपैकी कुणाच्या बैठकीला जायचे, यावरून राष्ट्रवादीचे आमदार चांगलेच गोंधळात सापडल्याचे चित्र आहे. अजित पवार यांनी वांद्रे येथील एमईटी कॉलेजमध्ये बैठक बोलवली आहे, त्यासाठी प्रतोद अनिल पाटील यांनी व्हीप जारी केला आहे. तर शरद पवार यांनी वायबी सेंटरमध्ये बैठक बोलावण्यात आली आहे. त्यासाठी प्रतोद जितेंद्र आव्हाड यांनी व्हीप बजावला आहे. 

बैठकीला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अधिकृत पत्र जारी केले आहे. यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्हिडिओ शेअर करून सर्व कार्यकर्त्यांनी पक्षाच्या बैठकीला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, जास्तीत जास्त आमदार, पदाधिकारी आपल्याकडे असल्याचा दावा अजित पवार गट करत आहे. तर आपल्याकडेच जास्त संख्याबळ असल्याचा दावा शरद पवार गटाकडून करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर या बैठकांमधून कोणाकडे किती ताकद हे स्पष्ट होणार आहे.एकमेकांच्या मांडीला मांडी लावून काम करणारे कार्यकर्ते दोन गटात विभागले आहेत. त्यामुळे शिवसेनेसारखी स्थिती राष्ट्रवादीत निर्माण झाली आहे. 

टॅग्स :महाराष्ट्रातील सत्तासंघर्षशरद पवारअजित पवारराष्ट्रवादी काँग्रेस