आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात दे धक्का; वरळीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची एन्ट्री
By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2022 11:42 AM2022-09-01T11:42:29+5:302022-09-01T11:43:06+5:30
वरळी मतदारसंघ हा शिवसेनेचा गड मानला जातो. याठिकाणी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे हे मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात.
मुंबई - राज्यातील सत्तांतरानंतर शिवसेनेत एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे असे दोन गट पडल्याचं चित्र निर्माण झाले. शिवसेनेचे तब्बल ४० आमदार आणि १२ खासदार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाले. तर उद्धव ठाकरे यांच्यासोबत फक्त १५ आमदार राहिले. यातील आणखी काही आमदार शिंदे गटात प्रवेश करतील असा दावा करण्यात येत आहे. मात्र तत्पूर्वी शिंदे गटाने वरळी मतदारसंघात एन्ट्री घेतली आहे.
आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे बॅनर्स झळकले आहेत. वरळीचा लाडका मार्केटचा राजा इथं श्री विघ्नहर्ता सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या स्वागत कमानीवर महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असे पोस्टर लावण्यात आले आहेत. या कमानीवर बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे यांचेही फोटो आहेत त्यामुळे आता वरळीत शिवसेना पदाधिकाऱ्यांमध्ये फूट पडणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे.
वरळी मतदारसंघ हा शिवसेनेचा गड मानला जातो. याठिकाणी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे हे मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात. स्थानिक आमदार आदित्यच्या मतदारसंघात शिवसेनेचे विधान परिषदेचे २ आमदार आहेत. त्यात सुनील शिंदे आणि सचिन अहिर यांचा समावेश आहे. त्याचसोबत मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यादेखील याच मतदारसंघात वास्तव्य करतात. राज्यात शिवसेनेत बंडखोरी झाल्यानंतरही वरळीतील कुणीही पदाधिकारी शिंदे गटात सहभागी झाले नव्हते. परंतु गणेशोत्सवात वरळीतील गणेश मंडपात एकनाथ शिंदेंचे बॅनर्स सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहेत.
दसरा मेळाव्यावरून ठाकरे-शिंदे गटात रस्सीखेच
गेल्या ५६ वर्षापासून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सुरू केलेल्या दसरा मेळाव्याची परंपरा तशीच कायम आहे. परंतु यंदा दसरा मेळावा कोण घेणार असा सवाल विचारला जात आहे. कारण उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोन्ही गटाकडून आम्हीच खरी शिवसेना आहोत असा दावा करण्यात येत आहे. बाळासाहेबांचे विचार आम्ही पुढे घेऊन जातोय. त्यामुळे बाळासाहेबांच्या दसरा मेळाव्याची परंपरा खंडीत होऊ देणार नाही असं मंत्री दीपक केसरकरांनी सांगितले. तर दसरा मेळाव्यावरून संभ्रम-बिभ्रम काही नाही. शिवतीर्थावर दसरा मेळावा आम्हीच घेणार असं पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी ठणकावून म्हटलं आहे.