आजची शांतता, उद्याचं वादळ...नाव लक्षात ठेवा; एक बॅनर अन् तेजस ठाकरे यांच्या 'एन्ट्री'चे संकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2023 09:43 AM2023-01-12T09:43:26+5:302023-01-12T10:44:19+5:30
राज्यातील ऐतिहासिक बंड आणि त्यानंतर झालेल्या सत्तांतरानंतर शिवसेनेच्या भवितव्याबद्दल प्रश्न निर्माण होऊ लागले.
मुंबई - राज्यात मागील वर्षी झालेल्या विधान परिषदेच्या निवडणूक निकालानंतर शिवसेनेत राजकीय बंड निर्माण झालं. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात तब्बल ४० आमदारांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंशी फारकत घेत सरकारमधून बाहेर पडले. शिवसेनेत पडलेल्या या फुटीमुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आले. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पदावरून पायउतार व्हावं लागले. या राजकीय घडामोडीनं शिवसेनेत वादळ आलं.
शिंदे यांच्या बंडखोरीनंतर उद्धव ठाकरे यांच्यासमोर पक्ष संघटना मजबूत करण्याचं आव्हान निर्माण झाले. त्यात आदित्य ठाकरे यांनी आक्रमकपणे पुढाकार घेतला. पण त्याचसोबत शिवसेनेत नवं नेतृत्व उदयास येण्याची चर्चा सुरु झाली. गिरगावात लावलेल्या बॅनरवरून त्याचीच झळक आता पाहायला मिळत आहे. आगामी महापालिका निवडणुका कुठल्याही क्षणी लागण्याची शक्यता आहे. त्यात गिरगावात ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी लावलेल्या बॅनर्सनं सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
राज्यातील ऐतिहासिक बंड आणि त्यानंतर झालेल्या सत्तांतरानंतर शिवसेनेच्या भवितव्याबद्दल प्रश्न निर्माण होऊ लागले. त्यात उद्धव ठाकरे यांचे धाकटे चिरंजीव आणि आदित्य ठाकरेंचे भाऊ तेजस ठाकरे हे सक्रीय राजकारणात उतरणार असल्याचं बोललं गेले. दहिहंडी कार्यक्रमात काही ठिकाणी तेजस ठाकरेंचे बॅनर्स लागले होते. मात्र गिरगावत बुधवारी रात्री तेजस ठाकरेंचा आणखी एक बॅनर झळकला. त्यात आजची शांतता...उद्याचं वादळ...नाव लक्षात ठेवा....तेजस उद्धवसाहेब ठाकरे असा आशय असलेला बॅनर लावण्यात आला आहे.
उद्धव ठाकरे यांच्यानंतर आदित्य ठाकरे राजकारणात सक्रीय आहेत त्यात आता ठाकरे गटाच्या शिवसैनिकांना तेजस ठाकरेंच्या राजकारणातील एन्ट्रीची प्रतिक्षा लागली आहे. त्यामुळे तेजस ठाकरे हे शिवसेनेतील नवं नेतृत्व असल्याचं बोललं जात आहे. गिरगावातील शाखाप्रमुख बाळा आहिरकर यांनी तेजस ठाकरेंचे बॅनर लावले आहेत. आहिरकर म्हणाले की, तेजस ठाकरेंबद्दल एक आकर्षण आहे. बाळासाहेबांनी एका भाषणात तेजसचा उल्लेख करताना तो माझ्यासारखा आहे असं म्हटलं होते. तेजस ठाकरे हे वादळच असणार आहे. सध्या वादळापूर्वीची शांतता आहे. त्यामुळे तेजस ठाकरे लवकरच राजकारणात यावेत असं तरुणांना वाटतं. तेजस ठाकरेंमध्ये आम्हाला बाळासाहेबांची छबी दिसते अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.