मुंबई : अथर्व स्कूल ऑफ फाइन आर्ट या संस्थेतर्फे आंतरराष्ट्रीय नृत्य दिवसाचे औचित्य साधून नुकतेच दोन दिवसीय ‘अथर्वोत्सव-२०१९’ ही कार्यशाळा माटुंगा येथील म्हैसूर असोसिएशन येथे आयोजित करण्यात आली होती. संस्थेच्या संस्थापिका श्यामल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली लोकनृत्याच्या दोन कार्यशाळांचे आयोजन यशस्वीरीत्या पार पडले.
भारतीय पारंपरिक लोकनृत्य व शास्त्रीय नृत्याचे धडे देण्याचे कार्य संस्था अविरतपणे गेली काही वर्षे करत आहे. तसेच भरतनाट्यम व लोकनृत्य कलेमध्ये निपुण नर्तक/नर्तिकी घडविण्याचा संस्थेचा मानस आहे. त्यासाठी गेल्या १६ वर्षांपासून संस्थेच्या वतीने बालवयातील तसेच तरुण-तरुणींना शास्त्रीय नृत्याचे सैद्धांतिक व प्रात्यक्षिक प्रशिक्षण दिले जाते. ‘लोकमत’ या कार्यशाळेचे माध्यम प्रायोजक होते. या वर्षी सुप्रसिद्ध कलाकार पद्मश्री गुरू दर्शनाबेत जव्हेरी (मणिपुरी), गुरू वैजयंती काशी (कुचिपुडी), गुरू देबी बासू (ओडिसी), गुरू लता सुरेंद्र (भरतनाट्यम), गुरू मुक्ता जोशी (कथ्थक), गुरू गीता विजयशंकर (मोहिनीअट्टम), गुरू कश्मिरा त्रिवेदी (भरतनाट्यम) यांनी आपली कला सादर केली. मुंबई व मुंबईबाहेरील एकूण २८ समूहांनी या कार्यशाळेमध्ये सहभाग घेतला होता. नवीन होतकरू युवकांना आपली कला सादर करण्यासाठी अथर्व स्कूल आॅफ फाइन आर्ट्स संस्थेमुळे उत्तम व्यासपीठ मिळाले.