बाप्पा आणि पोलिस 24 तास ऑन ड्युटी; मुंबई पोलिसांकडून विशेष खबरदारी

By मनीषा म्हात्रे | Published: September 18, 2023 06:25 AM2023-09-18T06:25:29+5:302023-09-18T06:26:25+5:30

गणेशोत्सव काळात प्रत्येक पोलिस डोळ्यात तेल घालून कर्तव्य बजावताना दिसत आहे. संवेदनशील ठिकाणी मिरवणुकीदरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी साध्या गणवेशातील पोलिसांचा वॉच असतो.

Bappa and police on duty 24 hours; Special precautions from Mumbai Police | बाप्पा आणि पोलिस 24 तास ऑन ड्युटी; मुंबई पोलिसांकडून विशेष खबरदारी

बाप्पा आणि पोलिस 24 तास ऑन ड्युटी; मुंबई पोलिसांकडून विशेष खबरदारी

googlenewsNext

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी महामुंबई सज्ज झाली आहे. वाजतगाजत लाडक्या बाप्पाचे आगमन होत आहे. या उत्सवात मुंबई पोलिस घरातील बाप्पाच्या तयारीऐवजी रस्त्यावर ऑन ड्यूटी २४ तास कार्यरत झाले आहेत. ‘माझ्या पप्पाने गणपती आणलाय, पण माझा पप्पाच सोबत नाही’ असा काहीसा भावनिक सूरही पोलिस वसाहतींमध्ये ऐकू येत आहे.

अलीकडे पुणे शहरात अल सफासारख्या दहशतवादी संघटनेने रचलेला पूर्वनियोजित कट उघडकीस आला होता. त्यापाठोपाठ इसिसच्या हस्तकांनाही अटक करण्यात आली. या कारवाईच्या पार्श्वभूमीवर यावर्षी मुंबई पोलिसांकडून विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. प्रतिबंधात्मक कारवाईसह ड्रोन, तसेच विविध हवाई उपकरणांवर बंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. शिवाय, पाण्यात तरंगणाऱ्या अर्धवट मूर्तींचे फोटो काढण्यासही मनाई करण्यात आली आहे. 

मुंबईत छोटे-मोठे नोंदणीकृत ३ हजार मंडळे आहेत. मात्र, आज गल्लोगल्ली बाप्पाची मूर्ती आणून उत्सव साजरा होत आहे. याच, गणरायाच्या स्वागतासाठी मुंबईत जवळपास ४५ हजार पोलिसांचा फौजफाटा तैनात आहे. या उत्सवादरम्यान कुठेही गालबोट लागू नयेत म्हणून पोलिसांकडून सर्व स्तरांवर लक्ष ठेवून आहेत. मुंबईत लालबाग, परळ, गिरगाव,  खेतवाडी, अंधेरी, चिंचपोकळी, विलेपार्ले, डोंगरी, उमरखाडीसह विविध ठिकाणी बाप्पाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी असते. गर्दीवर नियंत्रण आणताना अनेकदा पोलिसांसोबत वाद झाल्याच्या घटनाही समोर आल्या होत्या. पोलिसांकडून गणेशोत्सव मंडळांसोबत बैठका घेत मार्गदर्शन करण्यात येत आहे. 

गणेशोत्सव काळात प्रत्येक पोलिस डोळ्यात तेल घालून कर्तव्य बजावताना दिसत आहे. संवेदनशील ठिकाणी मिरवणुकीदरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी साध्या गणवेशातील पोलिसांचा वॉच असतो. गोवंडी, देवनार, मालाड, मालवणी, उमरखाडी, नागपाडा, मदनपुरा, भेंडी बाजार, वांद्रे परिसरात पोलिसांचा विशेष बंदोबस्त तैनात असतो. एक छोटीशी पोस्टदेखील परिस्थिती बदलू शकते यासाठी सायबर पोलिस सर्व सोशल मीडियावरही लक्ष ठेवून असतात. यादरम्यान होणाऱ्या वाहतूक कोंडीवर नियंत्रण आणण्यासाठी वाहतूक पोलिसांची भूमिका महत्त्वाची असते.

गणेशसेवक आणि पोलिस मित्रांचा पुढाकार 
बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीच्या  पुढाकाराने, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या सेवकांना मुंबई पोलिसांकडून जनजागृतीचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. या माध्यमातून किमान एक लाख सेवक तयार होतील, असा दावा समितीने केला आहे. या एक लाख गणसेवकांमुळे पोलिसांवर ताण कमी होण्यास मदत  होणार आहे. त्यासोबतच पोलिस मित्रांचीही भूमिका या काळात महत्त्वाची ठरणार आहे. 

महिलांच्या सुरक्षेसाठी निर्भयाचा आधार..
महिलांच्या सुरक्षेसाठी निर्भया पथकही २४ तास कार्यरत आहे. बाप्पाच्या गर्दीत चोरी, तसेच छेडछाडीच्या घटना घडू म्हणून साध्या गणवेशातील महिला पोलिस छुप्या कॅमेऱ्यांसह तैनात राहणार आहेत.

Web Title: Bappa and police on duty 24 hours; Special precautions from Mumbai Police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.