आफ्रिकेत जहाजावर बसला बाप्पा!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2020 07:36 AM2020-08-31T07:36:13+5:302020-08-31T07:37:05+5:30
कोरोनाकाळात सध्या गणेशोत्सवाच्या भव्य आयोजनावर काही बंधने आली असली तरी बाप्पाच्या भक्तांचा उत्साह तसूभरही कमी झालेला नाही. बाप्पाचे भक्त कोठेही असले तरी ते गणेशोत्सव साजरा करतातच.
- सीमा महांगडे
मुंबई : कोरोनाकाळात सध्या गणेशोत्सवाच्या भव्य आयोजनावर काही बंधने आली असली तरी बाप्पाच्या भक्तांचा उत्साह तसूभरही कमी झालेला नाही. बाप्पाचे भक्त कोठेही असले तरी ते गणेशोत्सव साजरा करतातच. असाच अनुभव सध्या दक्षिण आफ्रिकेच्या किनाऱ्यालगत घ्यायला मिळत आहे. तेथील भारतीय जहाजावर बाप्पाचे आगमन झाले आहे आणि पूर्ण दहा दिवस ‘सुखकर्ता दु:खहर्ता’ या व अशा अनेक आरत्यांचा गजर सुरू आहे.
जहाजांवर काम करणाऱ्यांना अनेकदा अधिक काळ याच मार्गावर फिरतीवर थांबावे लागते. त्यामुळे अनेक सणांनाही मुकावे लागते. मात्र काही जहाजांवर या गणेशोत्सवाच्या काळातही आनंद टिकून राहिला आहे. कारण तेथील कर्मचारी जहाजांवरच्यांनाच आपले कुटुंब समजून गणेशाची स्थापना करून गणेशोत्सव साजरा करत आहेत. सागरी प्रदूषणाचे नियम पाळून दक्षिण आफ्रिकेत भारतीय जहाजावर २५ नाविकांकडून गणेशोत्सव थाटामाटात साजरा होत आहे.
हेराल्ड मेरीटाइम सर्व्हिसेसचे (एचएमएस) ओसीअन डिग्निटी नावाचे जहाज सध्या दक्षिण आफ्रिकेच्या पश्चिम किनाºयालगत आहे. जहाजाचे कॅप्टन भूषण अभ्यंकर यांनी सांगितले की, कोरोना संकटामुळे अनेक कंपन्यांमधील नाविकांना जहाजावरच राहावे लागले आहे. काहींना ४ ऐवजी ८-८ महिने काढावे लागत आहेत. अशा परिस्थितीत सर्व नाविकांचा जल्लोष, उत्साह टिकून राहावा याकरिता आम्ही जहाजावरच गणेशाची स्थापना करण्याचा निर्णय घेतला. साधारणत: अरेबियन देशाच्या सागरी सीमेत प्रवेश केल्यानंतर मूर्तिपूजा, देवांचे फोटो अशा वस्तूंना बंदी असते, मात्र सध्या जहाज आफ्रिकन सागरी सीमेत असल्याने ही काळजी नसल्याचे अभ्यंकर यांनी स्पष्ट केले.
जहाजावरील सर्व नाविकांनी मैदा आणि पिठापासून पर्यावरणपूरक अशी गणेशाची मूर्ती बनवली असून खाण्याच्या रंगापासून ती आकर्षक रंगांमध्ये सजविली आहे. मारपोल (मरिन पोल्युशन)च्या नियमांनुसार सागरी हद्दीत कोणत्याही प्रकारचा कचरा टाकणे जहाजांना किंवा त्यावरील नाविकांना प्रतिबंधित असते. यामुळे पर्यावरणपूरक गणपतीची जहाजावर प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. जहाजावरील जो कर्मचारी कामात असतो, तो सोडून इतर सर्व वेळात वेळ काढून आरतीला उपस्थित राहतात.
पूजेसाठी वापरले जहाजावरीलच साहित्य
सजावटीसाठी जहाजावरील स्टुअर्ट, एबी, फिटर, चिफ इंजिनीअरपासून सर्वांनीच हातभार लावला. पूजेसाठी जहाजावरीलच साहित्याचा वापर करण्यात आला. कागदी फुलांची सजावट, जुन्या धातूंचे बनविलेले तबक, जुन्या चार्ट नकाशांच्या पेपरपासून बनविलेली जास्वंदीची फुले आणि विड्याची पाने हे सर्व आकर्षक ठरले आहे. यातून जहाजावरील प्रत्येकाची कल्पक दृष्टी पाहायला मिळाल्याचे कॅप्टन अभ्यंकर यांनी सांगितले.
मानसिक दिलासा देण्याचा प्रयत्न
कोरोनाकाळात नाविकांच्या उतरण्याची खूप गैरसोय होत आहे. मार्ग अवघड झाले आहेत. अशा परिस्थितीत कुटुंबापासून दूर असलेल्या नाविकांना उत्साहवर्धक वातावरण आणि मानसिक दिलासा यामधून मिळावा, हाच उद्देश आहे..
- राजेंद्र बर्वे, कार्यकारी अध्यक्ष,
एचएमएस मरिन सर्व्हिसेस लिमिटेड