मुंबई : जे.जे. स्कूल आॅफ आर्ट्सचे प्राध्यापक प्रशांत इप्टे यांना नेरूळ, शिरवणे येथील महामार्गावर रस्त्याच्या कोपऱ्याला तीन चिमुरडे गणपतीची मूर्ती घडविण्यात व्यस्त असलेले दिसले. त्यांनी हे चित्र आपल्या मोबाइल कॅमेऱ्यात बंदिस्त केले.नुकताच जे.जे. स्कूल आॅफ आर्ट्सच्या विद्यार्थ्यांचा मान्सून ट्रेक पार पडला. या वेळी, प्रवासात विद्यार्थ्यांची वाट पाहत असताना प्राध्यापक इप्टे यांना तन्वीर, आमीर आणि गणपत हे चिमुरडे बाप्पा घडवित असल्याचे दिसले. इप्टे यांनी कुतूहल म्हणून त्या चिमुकल्यांजवळ जाऊन हे पाहिले असता जवळच असणाऱ्या देवळाच्या प्रांगणातून माती गोळा करून कोणतेही शास्त्रशुद्ध प्रशिक्षण न घेता अत्यंत कुशलतेने हे चिमुरडे मूर्ती घडविण्यात दंग झालेले दिसून आले. प्राध्यापक इप्टे यांनी त्या चिमुरड्यांकडे विचारपूस केल्यावर ‘स्कूल के लिए बाप्पा बना रहे है..’ असे अगदी उत्सुकतेने सांगितले. शिवाय, शिरवणेनजीकच्या शिवाजीनगर विद्यालयात हे तिन्ही चिमुरडे शिकत असल्याचेही त्यांनी सांगितले. तन्वीरचा बाप्पा झालेला पाहून आमीर आणि गणपत हे दोन्ही मित्र बाप्पाची आरास करण्यासाठी धडपडताना दिसले. याविषयी प्राध्यापक इप्टे म्हणाले की, ज्या कुशलतेने हे तिन्ही चिमुरडे मूर्ती घडवित होते, हे पाहून खूप समाधानाची भावना मनात आली.
चिमुकल्यांनी साकारले बाप्पा!
By admin | Published: August 30, 2016 3:12 AM