कोविड सेंटरमधील ‘बाप्पा’मुळे मिळतेय सकारात्मक ऊर्जा; डॉक्टर्स, नर्सही उत्साहित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2020 03:45 AM2020-08-27T03:45:42+5:302020-08-27T03:45:51+5:30
शाळेतच उभारले आहे केंद्र : सुमारे दोन रुग्णांवर झाले यशस्वी उपचार; पोषक आहार, डॉक्टरांचे मार्गदर्शन
मुंबई : कोरोनाच्या काळात कोविड सेंटरमध्ये काम करणारे वैद्यकीय कर्मचारी आणि उपचार घेत असलेल्या रुग्णांना घरापासून लांब राहिल्यामुळे सण आणि उत्सवांमध्ये सहभागी होता येत नाही, यासाठीच मुलुंडच्या कोविड सेंटरमध्ये 'बाप्पाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे. यामुळे रुग्णासह येथील कर्मचाऱ्यांना सकारात्मक ऊर्जा मिळत असल्याचे येथील डॉक्टरांचे म्हणणे आहे.
मुलुंड पूर्वेकडील मिठागर परिसरात असलेल्या पालिकेच्या शाळेत अद्ययावत असे कोविड सेंटर उभारण्यात आले आहे. यात आतापर्यंत २ हजार ३०० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पोषक आहार, डॉक्टरांचे योग्य मार्गदर्शन तसेच मिळणाºया योग्य सोयीसुविधामुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अधिक आहे. सध्या ७४ रुग्ण येथे उपचार घेत आहे. कोविड सेंटर सुरू केल्यापासून वैद्यकीय कर्मचारी येथेच राहण्यास आहेत.
२४ तास सेवा, त्यात कुटुंबीयांपासून लांब राहण्यास असल्याने अनेकांना कुठल्याच सण उत्सवात सहभागी होता आले नाही. अखेर, या सेंटरमधील डॉक्टर्स, नर्स आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी मिळून सेंटरमध्ये गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला.
‘रुग्णांसाठी विशेष झोनची व्यवस्था’
कर्मचाºयांनी मिळून सेंटरमध्ये गणेश उत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला. आणि सुरक्षिततेच्या सर्व उपाययोजना करून या ठिकाणी गणेश उत्सव साजरा केला जात असल्याचे डॉक्टर हेमंत वेखंडे यांनी सांगितले. सिंहासनावर आरूढ झालेल्या गणपती बाप्पांच्या सुबक मूर्तीची प्राणप्रतिष्ठा येथे करण्यात आली आहे. त्यात, दोन वेळा येथे आरती होते. रुग्णांना यात सहभागी होता यावे म्हणून दोन झोन तयार करत, तेथे उभे राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.