बाप्पा पुढच्या वर्षी लवकर या..., सात दिवसांच्या गणरायांना निरोप, विसर्जनस्थळी भाविकांची गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2017 02:04 AM2017-09-01T02:04:57+5:302017-09-01T02:05:05+5:30
लाडक्या बाप्पाच्या आगमनाची वाट बघता बघता, बाप्पाच्या निरोपाचा दिवस केव्हा येऊन ठेपला हे कळलेही नाही. गुरुवारी सात दिवसांच्या वास्तव्यानंतर बाप्पाच्या मूर्तींचे आणि गौरी विसर्जन करण्यात आले.
मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाची वाट बघता बघता, बाप्पाच्या निरोपाचा दिवस केव्हा येऊन ठेपला हे कळलेही नाही. गुरुवारी सात दिवसांच्या वास्तव्यानंतर बाप्पाच्या मूर्तींचे आणि गौरी विसर्जन करण्यात आले. वाजत-गाजत मिरवणूक काढण्यात आली, मात्र त्याचवेळी जड अत:करणाने बाप्पाला निरोप देताना ‘पुढच्या वर्षी लवकर या!’ अशी साद घालण्यास लहानथोर विसरले नाहीत.
बाप्पाचा निरोप घेण्यापूर्वी भक्तगणांनी बाप्पाची विधिवत उत्तरपूजा, आरती केली. त्यानंतर विसर्जन करण्यासाठी बाप्पाची वाजत-गाजत मिरवणूक काढण्यात आली. कुणी मिरवणूक काढून तर कुणी वाहनांतून बाप्पाला मांडीवर घेऊन ‘गणपती चालले गावाला, चैन पडेना आम्हाला’च्या जयघोषात विसर्जनस्थळी जात होते.
लहान मुले ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ अशी विनवणी लाडक्या बाप्पाला करत होते. विसर्जनस्थळी नेल्यावर पुन्हा पूजा, आरती व त्याला नैवेद्य दाखवल्यानंतर बाप्पाचे विसर्जन करण्यात आले.
शहर-उपनगरांतील सर्व विसर्जनस्थळांवर भाविकांनी गर्दी केली केली होती. सर्व बाजारपेठा, तसेच महत्त्वाच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त होता. वाहतूककोंडी होऊ नये यासाठी पोलिसांनी विशेष नियोजन केले होते. गुरुवारी पाऊस नसल्याने विसर्जन मिरवणुका अगदी सुरळीत पार पडल्या.
गेट वे आॅफ इंडिया, गिरगाव चौपाटी, भाऊचा धक्का, दादर चौपाटी, जुहू चौपाटी, वरळी सी-फेस कोळीवाडा, वर्सोव्यासह पवई तलाव, कुर्ला येथील शीतल तलाव, भांडुप येथील शिवाजी तलाव, मुलुंड येथील मौर्या तलाव, कांजूर येथील नाहूर तलाव, कांदिवली गाव तलाव, श्यामनगर तलाव, चरई तलाव, बाणगंगा तलाव, शीव तलाव येथे गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी भक्तांची गर्दी झाली होती.
शहरात गुरुवारी रात्री उशिरापर्यंत ४६ हजार ६७९ मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. त्यापैकी ६२१ गणेशमूर्ती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या होत्या आणि ४० हजार ३७३ घरगुती गणेशमूर्ती होत्या. ३६८५ गौरींचे विसर्जन करण्यात आले.
६ हजार २१ मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावांमध्ये करण्यात आले. त्यामध्ये ५४ मूर्ती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या होत्या, ५ हजार ५८० गणेशमूर्ती घरगुती बाप्पांच्या होत्या व ३८७ गौरी होत्या.