‘रिअल इस्टेट’ला बाप्पा पावला; सप्टेंबर महिन्यात मुंबईत १०,६०० मालमत्तांची नोंदणी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2023 06:00 AM2023-10-01T06:00:07+5:302023-10-01T06:00:17+5:30
या माध्यमातून राज्य सरकारला अंदाजे ११२७ कोटी रुपयांचा महसूल मिळाल्याची माहिती आहे.
मुंबई : सप्टेंबर महिन्यामध्ये मुंबईच्या मालमत्ता खरेदी-विक्री व्यवहारांत लक्षणीय वाढ नोंदली गेली असून, या महिन्यात बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रामध्ये एकूण १० हजार ६०० मालमत्तांची नोंदणी झाली आहे.
या माध्यमातून राज्य सरकारला अंदाजे ११२७ कोटी रुपयांचा महसूल मिळाल्याची माहिती आहे. सलग चौथ्या महिन्यात मुंबई शहरातील मालमत्तांच्या खरेदी-विक्रीने १० हजारांचा टप्पा ओलांडला असून सप्टेंबरमध्ये झालेले व्यवहार हे गेल्या दहा वर्षांतील उच्चांक ठरले आहेत. गेल्यावर्षीच्या सप्टेंबर महिन्यात मुंबईत एकूण ८६२८ मालमत्तांची नोंदणी झाली होती.
उपलब्ध माहितीनुसार, मुंबई शहर व उपनगरात सप्टेंबर महिन्यात झालेल्या एकूण मालमत्तेच्या व्यवहारांमध्ये घरांच्या खरेदी-विक्रीची टक्केवारी सर्वाधिक म्हणजे ८२ टक्के नोंदली गेली आहे.
मुंबईतील जागांचे वाढते भाव हे तर एक कारण आहे. मात्र, नवे घर घेताना आणखी मोठे घर घेण्याकडे लोकांचा कल असल्याचेही दिसून येत आहे.
सरत्या महिन्यात सणासुदीचे दिवस असल्यामुळे व त्या अनुषंगाने ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी बांधकाम व्यावसायिकांनी केलेल्या आकर्षक घोषणेमुळे देखील खरेदीचा जोर वाढला आहे.
उर्वरित १८ टक्क्यांमध्ये व्यावसायिक मालमत्तांच्या खरेदी-विक्री व्यवहारांचा समावेश आहे. या मालमत्ता नोंदणीच्या आकड्यांमध्ये नव्या मालमत्ता व जुन्या (पुनर्खरेदी) मालमत्ता यांचा समावेश आहे.