कोरोनाच्या संकटाचा बाप्पा संहार कर!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2020 01:42 AM2020-08-22T01:42:07+5:302020-08-22T01:42:29+5:30
तसेच सार्वजनिक मंडळांचे ४५० कार्यकर्ते ‘कोविड योद्धा’ म्हणून वावरताना दिसणार आहेत.
विघ्नहर्त्याच्या आगमनाने कोरोनारूपी संकटाचा संहार व्हावा, असे साकडे घालत मुंबईकर गणेशोत्सवास सज्ज झाले आहेत. गर्दी टाळण्यासाठी या वर्षी हा सण साधेपणाने साजरा होणार आहे. मंडपाचे आकार, मूर्तींची उंची या वर्षी कमी करण्यात आली आहे. तसेच सार्वजनिक मंडळांचे ४५० कार्यकर्ते ‘कोविड योद्धा’ म्हणून वावरताना दिसणार आहेत.
>दीड हजार पोलिसांचा फौजफाटा तैनात
गणेशोत्सव आणि मोहरमच्या बंदोबस्तासाठी ५०० महिला व पुरुष अंमलदार ठिकठिकाणी तैनात असणार आहेत. यात लालबाग गणपती मंडळासाठी ३० महिला व पुरुष अंमलदारांचा अतिरिक्त फौजफाटा सज्ज आहे. तर दीड दिवस विसर्जन बंदोबस्तासाठी १ हजार पोलीस अंमलदार सज्ज असणार आहेत.
>महापालिकेला सहकार्य करा
मुंबईतील नैसर्गिक गणेश विसर्जन स्थळांवर होणारी गर्दी टाळण्यासाठी गणेशभक्तांनी आपली गणेशमूर्ती महापालिका कर्मचाऱ्यांकडे सुपूर्द करावी. महापालिका कर्मचारी त्या गणेशमूर्तींचे विधिवत विसर्जन करतील. तरी नागरिकांनी महापालिकेला सहकार्य करावे.
- किशोरी पेडणेकर,
मुंबईच्या महापौर
>विसर्जन स्थळे
चौपाट्यांवर ‘प्रवेश बंदी’ करण्यात आली आहे. १७० नैसर्गिक विसर्जन स्थळे आणि १६७ कृत्रिम तलाव तयार करण्यात आले आहेत. भाविकांकडून गणेशमूर्ती घेऊन महापालिका कर्मचारीच त्यांचे विधिवत विसर्जन करणार आहेत. यासाठी प्रत्येक विभागात सात ते आठ केंद्रे तयार केली आहेत़
महापालिका,
विविध मंडळे,
गृहनिर्माण संस्था,
लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था आदींच्या मदतीने कृत्रिम तलावांची निर्मिती करण्यात यावी.
न्यायालयाचे आदेश, महापालिका तसेच स्थानिक प्रशासनाचे मंडपाबाबतचे धोरण यांच्याशी सुसंगत व मर्यादित स्वरूपाचे मंडप उभारण्यात यावेत.
श्रीगणेशाची मूर्ती सार्वजनिक मंडळाकरिता चार फूट आणि घरगुती गणपतीसाठी दोन फुटांची असावी.
शक्यतो पारंपरिक मूर्र्तींऐवजी घरातील धातू, संगमरवर आदी मूर्र्तींचे पूजन करावे. मूर्ती शाडूची पर्यावरणपूरक असल्यास विसर्जन शक्यतो घरच्या घरी करावे. ते शक्य नसल्यास नजीकच्या कृत्रिम विसर्जनस्थळी विसर्जन करण्यात यावे.
उत्सवाकरिता देणगी-वर्गणी स्वेच्छेने दिल्यास तिचा स्वीकार करावा. जाहिरातीच्या प्रदर्शनामुळे गर्दी आकर्षित होणार नाही, असे पाहावे. आरोग्यविषयक, सामाजिक जाहिराती प्रदर्षित करण्यास पसंती देण्यात यावी.
सर्व सार्वजनिक गणेश मंडळांनी महापालिका/ स्थानिक प्रशासनाची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक.
सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी आरोग्यविषय उपक्रम उदा. रक्तदान शिबिर आयोजित करण्यास प्राधान्य द्यावे आणि कोरोना, मलेरिया, डेंग्यू आदी आजार व त्याचे प्रतिबंधक उपाय त्याचप्रमाणे स्वच्छता याबाबत जनजागृती करण्यात यावी.
आरती, भजन, कीर्तन व अन्य धार्मिक कार्यक्रम आयोजित करताना गर्दी होणार नाही, तसेच ध्वनिप्रदूषणासंदर्भातील नियमांचे व तरतुदींचे पालन करण्यात यावे.
श्रीगणेशाच्या दर्शनाची सुविधा आॅनलाइन, केबल नेटवर्क, वेबसाईट व फेसबुक इत्यादींद्वारे उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करावी.
गणपती मंडपामध्ये निर्जंतुकीकरण करावे; तसेच धर्मल स्क्रीनिंगची पर्याप्त व्यवस्था करण्यात यावी. प्रत्यक्ष येऊन दर्शन घेऊ इच्छिणाºया भाविकांसाठी शारीरिक अंतराचे (फिजिकल डिस्टन्सिंग) तसेच स्वच्छतेचे नियम पाळले जातील, याकडे लक्ष द्यावे.
श्रींची आगमन व विसर्जन मिरवणूक काढण्यात येऊ नये. विसर्जनाच्या पारंपरिक पद्धतीत विसर्जनस्थळी होणारी आरती घरीच करून विसर्जनस्थळी कमीतकमी वेळ थांबावे. (राज्य शासनाच्या सूचना)
>मूर्ती शहरात
दरवर्षी सरासरी १२ हजार सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आणि घरोघरी असे मिळून सुमारे दोन लाखांहून अधिक गणेशमूर्ती मुंबईत असतात. प्लास्टर आॅफ पॅरिसच्या गणेशमूर्ती मुंबईतच तयार होत असून पेण, राजस्थान, गुजरात, दिल्ली येथून शाडूच्या व अन्य मूर्ती येत असतात. या वर्षी लॉकडाऊनमुळे बहुतांशी लोक आपल्या मूळ गावी परतले आहेत. तसेच अनेकांची नोकरी गेल्यामुळे या वर्षी गणेशमूर्तींची स्थापना करण्याचे प्रमाण कमी आहे.