बाप्पा यावे, कोरोनाचे विघ्न पळवावे!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2020 03:26 AM2020-08-22T03:26:18+5:302020-08-22T03:26:30+5:30

गणपती ही बुद्धीची देवता, त्यामुळे तिच्या स्वागतासाठी, सगळी बंधने पाळून गणेशभक्तांनी निरनिराळ्या कल्पना लढवल्या आहेत.

Bappa should come, escape Corona's disturbance! | बाप्पा यावे, कोरोनाचे विघ्न पळवावे!

बाप्पा यावे, कोरोनाचे विघ्न पळवावे!

Next

मुंबई : सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरूवात झाल्यापासून बहुधा प्रथमच निर्बंधासह गणेशोत्सव साजरा करण्याची वेळ यंदा आली आहे. कोरोनामुळे सण साजरा करण्यावर बंधने आली असली तरी गणेशभक्तांच्या उत्साहात मात्र तीळभरही कमतरता आली नाही. गणपती ही बुद्धीची देवता, त्यामुळे तिच्या स्वागतासाठी, सगळी बंधने पाळून गणेशभक्तांनी निरनिराळ्या कल्पना लढवल्या आहेत.
आॅनलाईन दर्शन-आरतीपासून ते घरगुती सजावटीतील कल्पकता ही यंदाच्या गणेशोत्सवाची वैशिष्ट्ये आहेत. कोरोनापासून बचाव करणारी लस लवकर मिळू दे, सर्वांवर आलेले अनिश्चिततेचे मळभ लवकर दूर होऊ देत, अशी मनोमन प्रार्थना करत गणेशभक्त आज गणरायाची प्राणप्रतिष्ठापना करतील.
गेल्या काही दिवसांपासूून लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल करण्यास सुरूवात झाली आहे. मुंबईसह काही प्रमुख शहरात तर दुकानांवरील बंधने कमी करण्यात आली आहेत. दोन दिवसांपासून इ-पास शिवाय राज्यभर एसटीचा प्रवास सुरू झाला आहे. गणपती बाप्पा अशा आणखी सकारात्मक गोष्टी घेऊनच येत असल्याचा विश्वास गणेशभक्तांना आहे.
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांवर कधी नव्हे इतके निर्बंध असले तरी त्यांनी त्यातही सकारात्मकता शोधली आहे. मूर्ती न आणण्यापासून, मूर्तींचे आकार कमी करण्यासारखे निर्णय घेण्यात आले. फिजिकल डिस्टन्सिंग पाळण्यासाठी कार्यकर्त्यांची फळी तयार केली आहे. रक्तदान, वैद्यकीय शिबिरांचेही आयोजन होत आहे. काही मंडळांनी कोरोना काळात परिसरातील ज्येष्ठांची काळजी घेण्याचे व्रत घेतले आहे. असेच काहीसे व्रत सर्वच मुंबईकरांनी घेतले असून सामाजिक बांधिलकी जोपासत कोरोनाशी समर्थपणे लढा देण्याचा निर्धार त्यांनी केल्याचे चित्र आहे.

Web Title: Bappa should come, escape Corona's disturbance!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.