Join us  

बाप्पा नाचत येणार; मंडपासाठीचे शुल्क, अनामत रक्कम माफ होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2023 3:15 PM

मुंबई : पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी यंदा मुंबई महापालिकेच्या प्रत्येक विभागात एक जागा शाडू मातीपासून गणेशमूर्ती घडविण्यासाठी मूर्तिकारांना मोफत ...

मुंबई : पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी यंदा मुंबई महापालिकेच्या प्रत्येक विभागात एक जागा शाडू मातीपासून गणेशमूर्ती घडविण्यासाठी मूर्तिकारांना मोफत उपलब्ध करून देण्याचे निर्देश महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी बुधवारी एका विशेष बैठकीदरम्यान दिले आहेत. शिवाय काही प्रमाणात शाडू माती उपलब्ध करून देण्याचेही निर्देश परिमंडळीय उपायुक्तांना देण्यात आले आहेत. महत्त्वाचे म्हणजे मुख्यमंत्र्याच्या सूचनेप्रमाणे  गणेशोत्सव मंडळांच्या मंडपांसाठी आकारले जाणारे शुल्क व अनामत रक्कम माफ करण्याचाही निर्णय घेण्यात आला असून, त्याची अंमलबजावणी सुरू केली आहे.यंदाचा गणेशोत्सव अधिकाधिक पर्यावरणपूरक करण्याच्या दृष्टीने महापालिका विविध स्तरीय कार्यवाही करीत असून, याच पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्तांनी बुधवारी सर्व अतिरिक्त आयुक्त, बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक यांच्यासह सर्व परिमंडळांचे सह आयुक्त/उपआयुक्त, सहायक आयुक्त, विभागप्रमुख यांच्यासोबत बैठक घेतली. गेल्यावर्षी ज्या  मंडळांची शुल्क व अनामत रक्कम जमा असेल, त्यांना ती पुढील ७ दिवसांच्या आत परत करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या आहेत. 

महामार्ग दुरुस्ती पावसाळ्याआधी पूर्व व पश्चिम द्रुतगती महामार्गावरील दुरूस्तीची कामे पूर्ण करण्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांची पथके तयार करून सदर कामांचा आढावा घेण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या आहेत.

रोषणाईचा रंग पर्यावरणपूरक असावा सध्या मुंबई सुशोभीकरण प्रकल्पाअंतर्गत शहरात करण्यात येणाऱ्या सुशोभीकरणासाठी रोषणाईचे रंग पर्यावरणपूरक असावेत. झाडांना जी रोषणाई करण्यात येणार आहे, त्यासाठी प्रामुख्याने हिरव्या रंगातील विविध छटांचा वापर करावा, अशा सूचना आयुक्तांनी दिल्या आहेत. 

विमानतळावर ‘आपला दवाखाना’  सुरू करावा!हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ‘आपला दवाखाना’ला मुंबईकरांचा अतिशय चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे अशाच पद्धतीचा ‘आपला दवाखाना’ हा छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमातळानजीक देखील सुरू करावा, अशा सूचना पलिका आयुक्तांनी केल्या आहेत.  

टॅग्स :मुंबईगणेशोत्सव विधी