मुंबई: गणपती बाप्पा आमच्यावर आलेले 'ईडी'चं संकट नक्की दूर करेल अशी भावना शिवसेनेचे जेष्ठ नेते मनोहर जोशी यांनी त्यांच्या घरी गणपतीची प्रतिष्ठापना झाल्यानंतर एका वृत्तवाहिनीशी बोलताना व्यक्त केली आहे.
कोहीनूर स्क्वेअर आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी त्यांचा मुलगा उन्मेष जोशी यांची काही दिवसांपूर्वीच ईडीकडून चौकशी करण्यात आली होती. त्यावर आज मनोहर जोशींनी चौकशीतून काहीच संपन्न होणार नसल्याचे सांगितले. तसेच गणपती बाप्पा नेहमीच विघ्न दूर करतो, त्यामुळे बाप्पा आमच्यावर आलेले ईडीचं संकट देखील नक्कीचं दूर करेल असे सांगत भावना व्यक्त केली आहे.
शिवसेना भवनासमोरील कोहिनूर मिल-३ या जागेत उभारल्या जाणा-या कोहिनूर स्केअर टॉवरच्या २१०० कोटीच्या प्रकल्पामध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा ईडीला संशय आहे. त्यामुळे इन्फ्रास्ट्रकचर लीजिंग अँड फायनान्शियल सर्व्हिसेसद्वारे (आयएलएफएस) कंपनीचे थकीत कर्जाच्या अनुषंगाने उन्मेष जोशीसह मनसेप्रमुख व कोहिनूर समूहाचे तत्कालीन भागीदार राज ठाकरे आणि राजन शिरोडकर यांची देखील ईडीने चौकशी केली होती.