- अजय परचुरेमुंबई : राज्यात असलेल्या थर्माकोल आणि प्लॅस्टिकबंदीचा फटका जसा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना बसला तसा घरगुती गणपतीला सजावट करणाऱ्या सर्वसामान्य गणेशभक्तांनाही तो बसतो आहे. त्यामुळे घरी येणा-या बाप्पासाठी गणेशभक्तांनी आता घरगुती आरास करण्यासाठी नवनवीन फंडे वापरायला सुरुवात केली आहे. मुंबईतील दोन तरुणांनी महाराष्ट्राची शान असलेल्या पैठणी साड्यांनीच आरास करण्याचा निर्णय घेतला आहे. पारंपरिक पैठणी साड्यांची बाप्पाच्या मूर्तीसमोर आरास करण्याची ही त्यांची अनोखी आयडिया मुंबईतील घराघरांत आता लोकप्रिय होत आहे.राकेश हांडे आणि रत्नकांत जगताप हे दोन मित्र सेट डिझाईनिंगच्या व्यवसायात गेली कित्येक वर्षे आहेत. आपल्या घरी येणाºया बाप्पांच्या स्वागतासाठी दरवर्षी हे तरुण विविध सामाजिक विषयांवर भाष्य करणारे देखावे बाप्पाच्या देखाव्यासाठी उभारतात. पण या वर्षी जाहीर झालेल्या प्लॅस्टिकबंदीनंतर या दोन्ही मित्रांनी बाप्पाच्या देखाव्यांत पैठणी साड्यांचा वापर करण्याचा निर्णय घेतला. पैठणी हा महिलांमध्ये अत्यंत लोकप्रिय साडीचा प्रकार आहे. मात्र खास सभारंभासाठीच महिला पैठणी साड्या परिधान करतात. म्हणून या तरुणांनी आपल्या घरातील आई, बहीण, पत्नीच्या पैठणी साड्या एकत्र करून या साड्यांचा वापर करून दिमाखदार आरास तयार करण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्यांची पत्नी मीनल हांडे आणि सुनीता जगताप यांनीही मदत केली. सध्या त्यांनी याचे संकल्पचित्र तयार केले आहे. सध्या त्यांच्या घरी या पैठणींना आकर्षक पद्धतीने सजविण्याचे काम सुरू आहे. त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन त्यांचे नातेवाईक, मित्रमंडळींनीही आपल्या घरी पैठणीची आरास करण्याचा निर्णय घेतला आहे.
बाप्पाला पैठणी साड्यांची आरास; घरगुती गणपतीसाठी मराठी तरुणांची नवी शक्कल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 06, 2018 5:58 AM