पारंपरिक वाद्यांच्या तालावर बाप्पाचे विसर्जन
By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2018 05:47 AM2018-09-25T05:47:26+5:302018-09-25T05:47:41+5:30
डीजे की पारंपरिक वाद्ये? या वादाला बगल देत मोठ्या थाटामाटात लाडक्या बाप्पाचे विसर्जन रविवारी दिवसभर पार पडले. या वेळी दीर्घकाळ चाललेल्या विसर्जन मिरवणुकीनंतर लालबागचा राजाचे विसर्जन सोमवारी सकाळी पार पाडले.
मुंबई : डीजे की पारंपरिक वाद्ये? या वादाला बगल देत मोठ्या थाटामाटात लाडक्या बाप्पाचे विसर्जन रविवारी दिवसभर पार पडले. या वेळी दीर्घकाळ चाललेल्या विसर्जन मिरवणुकीनंतर लालबागचा राजाचे विसर्जन सोमवारी सकाळी पार पाडले. मोजक्याच ठिकाणचा अपवाद वगळता डीजेला बगल देत पारंपरिक वाद्यांच्या तालावर सुमारे ४० हजारांहून अधिक घरगुती व सार्वजनिक गणपतींचे विसर्जन रविवारी झाले.
अनंत चतुर्दशीला कॉटनचा राजा, मुंबईचा राजा, गणेश गल्ली, लालबागचा राजा, चिंचपोकळीचा चिंतामणी, काळाचौकीचा महागणपती, परळचा महाराजा या गणपतींच्या दर्शनासाठी लाखो भाविकांनी रविवार सकाळपासूनच लालबागमध्ये गर्दी केली होती. कॉटनग्रीनचा राजा आणि मुंबईचा राजा येताच त्यांच्या दर्शनासाठी भक्तांनी जल्लोष केला. तर आरतीच्या तालावर निघालेल्या चिंचपोकळीच्या चिंतामणीने लालबागचे वातावरण भक्तिमय झाले होते. लालबागचा राजा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावर येताच एकच जयघोष ऐकू आला. चिंचपोकळी पुलावरून जाणाऱ्या प्रत्येक गणेशमूर्तीवर श्रॉफ बिल्डिंग पुष्पवृष्टी उत्सव मंडळातर्फे गुलाल व पुष्पांचा वर्षाव सुरू होता.
मुंबईसह बहुतांश गणेशभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या लालबागचा राजाच्या विसर्जनाला यंदाही तब्बल २२ तासांचा अवधी लागला. मुंबईचा राजा गणेशगल्लीची विसर्जन मिरवणूकही दीर्घकाळ रंगली.
गेटवे आॅफ इंडियावर गणेश दर्शनासाठी आलेल्या परदेशी पर्यटकांची संख्या यंदाही वाखाणण्याजोगी होती.
उत्साह कायम...
विसर्जन मिरवणुकीत मंडळांनी मोठ्या संख्येने ढोल पथकांना पसंती दिल्याचे चित्र शहरासह उपनगरात होते. ज्या मंडळांना ढोल पथकांचे दर परवडले नाहीत, त्यांनी डीजेतील स्पीकरची संख्या कमी करण्याची शक्कल लढवली. केवळ दोन ते चार स्पीकर लावत मिरवणुकीत नाचण्याचा आनंद घेतला. एकूणच मिरवणुकीतील उत्साह कायम होता.
गणेशोत्सव मिरवणुकीत मुंबईचा आवाज खाली
मुंबई : दहा दिवसांच्या बाप्पाच्या विसर्जनावेळी पुणे आणि नाशिक येथे ध्वनिप्रदूषणासंबंधीचे नियम पायदळी तुडविण्यात आले असतानाच मुंबईकरांनी मात्र, विसर्जन मिरवणुकीत समजूतदारपणाचे दर्शन घडविले. मागील दोन वर्षांशी तुलना करता मुंबईमधील आवाजाची पातळी घटल्याचे पाहायला मिळाले.
रविवारी रात्री ७ वाजल्यापासून रात्री पावणे एकपर्यंत आवाजाची नोंद करण्यात आली आहे. त्यानुसार, ११३.९ डेसिबल आवाजाची नोंद झाली. २०१७ साली याच कालावधीत आवाजाची पातळी ११९.८ डेसिबल तर, २०१६ साली आवाजाची पातळी ११६.४ डेसिबल होती.
दरम्यान, गिरगाव चौपाटी येथे रात्री १२ वाजता वाद्यवृंद बंद करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र रात्री १ वाजेपर्यंत वाद्यवृंदांचा आवाज सुरूच होता, अशी नोंद आवाज फाउंडेशनने केली आहे.